Chandrashekhar Bawankule On Sharad Pawar: संविधान बदलण्याच्या मुद्द्यावरून शरद पवारांसह विरोधक अफवा पसरवत आहेत, देशाची घटना कोणीही बदलू शकत नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्पष्टीकरण
Chandrashekhar Bawankule, Sharad Pawar (PC - Facebook)

Chandrashekhar Bawankule On Sharad Pawar: लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Election 2024) मोदी सरकार (Modi Govt) पुन्हा सत्तेत आल्यास राज्यघटनेत बदल करण्यात येतील, असा उल्लेख विरोधी पक्षनेते सातत्याने करत आहेत. मात्र, संविधान (Constitution) बदलण्याची विरोधकांची चर्चा अमित शहा यांनी फेटाळून लावली आहे. संविधान बदलण्याच्या या मुद्द्यावर शरद पवार यांनीही भाष्य केले आहे. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी रविवारी सांगितले की, भाजपचा राज्यघटना बदलण्याचा हेतू असल्याच्या अफवा पसरवणाऱ्यांमध्ये शरद पवारांसारखे (Sharad Pawar) ज्येष्ठ नेतेदेखील आहेत. ही मोठी शोकांतिका आहे.

देशाची राज्यघटना कोणीही बदलू शकत नाही - चंद्रशेखर बावनकुळे

देशाची राज्यघटना अतिशय मजबूत असून ती कोणीही बदलू शकत नाही, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पवार यांच्यासह नेत्यांच्या खोटेपणाला लोकांनी बळी पडू नये. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या विविध हमीमुळं राज्यघटना बदलण्याच्या भाजपच्या इराद्याबद्दल अफवा पसरवल्या जात आहेत. शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनाही या कळपात सामील होताना पाहणं दुर्दैवी आहे, असं बावनकुळे यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे. (हेही वाचा - Nitin Gadkari On Loksabha Election 2024: 'मी ही निवडणूक 5 लाखांहून अधिक मतांनी जिंकेन'; नितीन गडकरी यांचा दावा)

मोदी सरकारने संविधानाचा आदर केला - बावनकुळे

भारताचे संविधान बदलणे हे कुणाच्या बापालाही शक्य नाही. संविधान अत्यंत मजबूत आहे. शरद पवार ज्या काँग्रेस मध्ये एकेकाळी होते तो काँग्रेस पक्ष सत्तेत असताना घटना दुरुस्तीच्या नावाखाली संविधान कितीदा बदलविण्यात आले, याचा आकडा पवार साहेबांकडे नक्कीच असणार. उलट मोदीजी यांच्या नेतृत्वातील सरकारने मागील दहा वर्षात संविधानाचा सन्मानच केला आहे. पंतप्रधान मोदीजींनी संसद भवनाला संविधान सदन असं नाव दिलं आहे. भाजपने नेहमीच घटनात्मक मूल्य आणि राष्ट्रहितासाठी काम केलं आहे. त्यामुळे जनतेनं कुठल्याही नेत्यांच्या भुलथापांना बळी पडू नये. पवार साहेबांच्या तर अजिबातच नाही, असं आवाहन बावळकुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये केलं आहे.