मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या मध्यस्तीमुळे अखेर काल राज्यातील रिक्षा चालकांनी आपला संप मागे घेतला आहे. मात्र रिक्षाला पर्याय म्हणून ओला-उबेर (OLA-Uber) या सेवांबाबतही नागरिक त्रस्त आहेत. सोमवारी मुंबई मध्ये मुसळधार पाऊस झाला, मात्र याचा फायदा ओला-उबेर या कंपन्यांना झाला. या काळात रिक्षा चालक संपावर जाण्याच्या तयारीत असल्याने ग्राहकांनी ओला-उबेरची सेवा वापरण्यास सुरुवात केली. मात्र या सेवांचे दर गगनाला भिडले होते, ज्यामध्ये चक्क विमानप्रवास घडू शकेल.
मुंबई मिररने याबाबत वृत्त दिले आहे. सोमवारी पावसामुळे रस्त्यावर फार कमी वाहने होती. त्यात टॅक्सी हे ठराविक परिसरातच कार्यरत होते. रिक्षा चालकही भाडे घेण्यास नकार देत होते, अशा काळात ओला-उबेरने आपला हाथ साफ करून घेतला. त्यांनी आपल्या सेवांचे दर अव्वाच्या सव्वा वाढवले होते. एका उबेर ग्राहकाला चक्क 1,698 ते 1,947 रुपये इतके भाडे दाखवले गेले. या दारामध्ये मुंबई ते गोवा असा विमान प्रवास घडू शकतो. (हेही वाचा: OLA आता संपूर्ण महिना कार भाड्यावर देणार, गाडी खरेदी करण्याची चिंता दूर होणार)
काही प्रवासी इतकी रक्कम द्यायला तयारही झाले होते मात्र ऐनवेळी चालकांनी राईड रद्द केल्याने ग्राहकांची चिडचिड अजूनच वाढली. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून रिक्षा चालकांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. यामध्ये रिक्षा भाडेवाढ, अवैध प्रवासी वाहतुकीसह ओला, उबेरसारख्या टॅक्सी कंपन्यांची सेवा त्वरित बंद करा या मुख्य मागण्या आहेत. यासाठी 9 जुलै पासून संपाची हाक देण्यात आली होती. यामध्ये देशातील प्रमुख शहरांमधील रिक्षा चालक सहभागी होणार होते. मात्र जनतेची होणारी गैरसोय ओळखून मुख्यमंत्र्यांनी आवाहन केल्यावर आज होणारा हा संप होणार नसल्याची माहिती मिळत आहे.