विविध मागण्यांसाठी सुरु असलेला ओला (Ola) आणि उबर (Uber) या प्रायव्हेट टॅक्सी सेवेचा संप अखेर आज मागे घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांच्याशी हिवाळी अधिवेशनानंतर भेटीचं आणि मागण्यांवर विचार करण्याचं आश्वासन मिळाल्यानंतर अखेर ओला, उबर चालकांनी संप मागे घेतल्याने मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील सुमारे ३० हजार ओला, उबर टॅक्सीचालक-मालकांनी 17 नोव्हेंबर पासून संप पुकारला होता.
युनियन नेते सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्याची भेट घेतली. त्यावेळेस हिवाळी अधिवेशनानंतर बैठकीत ओला आणि उबर चालकांनी केलेल्या मागण्यांबाबत चर्चा होईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
आज उबर आणि ओला चालकांनी मुंबईतील लालबाग परिसरातील भारतमाता सिनेमागृह ते आझाद मैदानापर्यंत मोर्चा आयोजित केला होता. हा मोर्चा पोलिसांनी अडवल्यानंतर त्यांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेलं. या बैठकीत चालकांच्या मागण्या काय आहेत यावर सविस्तर चर्चा झाली.
कोणत्या मागण्यांसाठी ओला, उबर चालक संपावर ?
- एसी हॅचबॅक कॅबसाठी प्रतिकिलोमीटर १६ रुपये,
-
एसी सदान कॅबसाठी प्रतिकिलोमीटर १८ रुपये
-
एसी एसयूव्ही कारसाठी पहिल्या चार किलोमीटरला किमान १०० ते १५० रुपये भाडेदर निश्चित (fixed fare ) ठेवावे
-
प्रत्येक कॅब चालकाचा दिवसाला किमान ३००० रुपयांचा व्यवसाय व्हायला हवा
मुख्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनानंतर बैठक घेऊन मागण्यांवर विचार करू असे सांगितल्याने हा संप मागे घेण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.