राज्यात विधानसभेचे (Maharashtra Assembly Election) बिगुल वाजले आहे. पक्षांनी उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या, त्यानंतर अर्ज भरून मागे घेण्याची प्रक्रियाही पार पडली. यावेळी तिकीटावरून काही अनुचित प्रकारही घडले. घाटकोपर पूर्व मतदारसंघात भाजपने माजी मंत्री प्रकाश मेहतांना डावलून, नगरसेवक पराग शहा यांना उमेदवारी दिली. त्यानंतर मेहतांच्या समर्थांनी चांगलाच राडा घातला होता. असा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून आता उमेदवाराला खास सुरक्षा प्रदान केली जाणार आहे. म्हणजेच आता प्रत्येक उमेदवारासोबत एक पोलीस असणार आहे.
पक्षाने उमेदवारी दिलेल्या उमेदवारासोबतच अपक्ष उमेदवारालाही बॉडीगार्ड मिळणार आहे. प्रचारादरम्यान उमेदवाराला प्रचंड फिरावे लागते. रॅली, पदयात्रा आयोजित केल्या जातात. तिथे दोन उमेदवार समोर समोर येण्याच्या शक्यताही असतात. अशावेळी भांडणे होऊन उमेदवाराला इजा होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे एखादा सुरक्षा रक्षक सोबत असल्यास हा प्रकार टाळला जाऊ शकतो, म्हणूनच पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.
उमेदवारासोबत पोलीस असल्यास त्याच्या प्रचाराची सर्व माहिती पोलिसांना मिळू शकेल. त्यामुळे पोलीसही योग्य प्रकारे बंदोबस्त करू शकतात. हा सुरक्षा रक्षक उमेदवाराच्या प्रत्येक प्रचार, रॅली, पदयात्रेत सहभागी होणार आहे.