BEST Strike | (Image courtesy: Archived, edited, representative)

BEST Strike Continues On Eighth Day: तब्बल एक आठवडा उलटून दुसऱ्या आठवड्यात प्रवेश केला तरीही बेस्ट संपावर तोडगा निघू शकला नाही. बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आज ( मंगळवार, 15 जानेवारी) आठवा दिवस आहे. संप प्रदीर्घ काळ रखडल्याने मुंबईकरांची कोंडी झाली आहे. दरम्यान, संपावर तोडगा काढण्याच्या उद्देशाने एक उच्चस्तरीय बैठक आज पार पडत आहे. दरम्यान, या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर मात्र आम्हाला आदेशच द्यावे लागतील, असा सज्जड दम मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी झालेल्या सुनावणीत दिला आहे. त्यामुळे सकारात्मक बोलणी होऊन संपावर तोडगा निघेल अशी आशा आहे.

उच्च न्यायायालयात सोमवारी झालेल्या सुनावणीत बेस्ट संपावर तोडाग निघेल अशी आशा होती. मात्र, प्रत्यक्षात तसे घडले नाही. पालिका आणि बेस्ट प्रशासन विरुद्ध कामगार संघटना यांच्यात सुनावणीदरम्यानही आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. अखेर कोणत्याच मुद्द्यावर एकमत न झाल्याने तोडगा निघाला नाही. आता या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीत काय निर्णय होतो याबाबत उत्सुकता आहे .(हेही वाचा : बेस्ट संपावर बोलणी निष्फळ; मंत्रालयातील बैठकीत सकारात्मक चर्चा, तोडगा नाही: शशांक राव)

दरम्यान, अॅड. दत्ता माने यांनी बेस्ट संपाविरुद्ध न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेत 7 जानेवारीपासून सुरु असलेला संप हा बेकायदेशीर आहे. या संपामुळे सर्वसामान्य जनता, प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे हा संप मागे घेण्यात यावा असी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. न्यायालयाने या याचिकेची दखल घेत संपावर तोडगा काढण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्याचे आदेश दिले होते. संपावर तोडगा काढण्यासाठी पालिका, ‘बेस्ट’ प्रशासन आणि कामगार संघटनांनीही या समितीसोबतच्या बैठकीत सहभागी व्हावे, असेही आदेश न्यायालयाने दिले होते.