दिवाळी आली तरी पगार नाही, ओव्हरटाईमची रक्कम घटली; FTII कर्मचाऱ्यांनी पुकारले कामबंद आंदोलन;
FTII (संग्रहित संपादित प्रतिमा)

शासन एकीकडे सरकारी कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगानुसार बोनस, पगारवाढ देत आहे, तर दुसरीकडे कंत्राटी कर्मचाऱ्यांना 4 महिने पगार मिळण्यास विलंब होत आहे. ही अवस्था आहे पुण्यातली (Pune) फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये (FTII) विविध विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची. केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याअंतर्गत एफटीआयआयचा कारभार चालतो. चित्रपट प्रशिक्षणाबाबत देशातील अग्रगण्य संस्था म्हणून एफटीआयआयकडे पहिले जाते. मात्र या संस्थेमधील कर्मचाऱ्यांची पगाराच्या विलंबामुळे दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे.

एफटीआयआय संस्थेमध्ये विविध विभागांमध्ये जवळपास 175 कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करतात. दिल्लीस्थित ओरियन सिक्युरिटी सोल्यूशन प्रा. लिमिटेड ही कंपनी बँक खात्याद्वारे या कर्मचाऱ्यांच्या पगार देते. मात्र गेले काही महिने महिन्याचे पंधरा दिवस उलटून गेले तरी या कर्मचाऱ्यांचे पाग्र होत नाहीत. या महिन्यात तर दिवाळी आहे. इतका मोठा सण तोंडावर येऊन ठेपला असला तरी या कर्मचाऱ्यांना मागील महिन्यातील पगार अजून मिळाला नाही. तसेच ओव्हरटाईमची रक्कमही 157 वरून 80 रु. करण्यात आली आहे, व तीही वेळेवर मिळाली नाही.

याबाबत कर्मचारांनी एफटीआयआय प्रशासनाकडे मदत मागितली होती. मात्र हे लोक कंत्राटी असल्याने त्यांना कोणतेही सहकार्य देण्यास प्रशासनाने नकार दिला. कर्मचाऱ्यांनी पगार वेळेवर मिळण्याबाबत विचारणा केली असता त्यांना कामावरून काढले जाण्याची धमकी दिली जाते. अशाप्रकारे हे कर्मचारी तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत आहेत. त्यामुळे आता कर्मचारांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे.