Nisarga Cyclone: उद्यापासून दोन दिवस राज्यातील सर्व गोष्टी बंद; प्रशासनाला सहकार्य करण्याचे, घराबाहेर न पडण्याचे सीएम उद्धव ठाकरे यांचे जनतेला आवाहन
Chief Minister Uddhav Thackeray | (Photo Credits- ANI)

महाराष्ट्रावर (Maharashtra) चालून येत असलेले निसर्ग चक्रीवादळ (Nisarga Cyclone) हळू हळू पुढे सरकर अलिबागच्या दिशेने कूच करत आहे. हे वादळ उद्या दुपारी मुंबईवर (Mumbai) धडकणार आहे. या वादळामुळे होणारा पाऊस (Rain) व त्यामुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीचे गणित ठरवून राज्य प्रशासनाने सर्व उपाययोजना केल्या आहेत. आज या वादळाच्या उपययोजनांबाबत राज्यमंत्री मंडळाची महत्वाची बैठक पार पडली, त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी या चक्रीवादळासंबंधी जनतेशी संवाद साधला. भाषणाच्या सुरुवातील उद्धव ठाकरे यांनी अमित शाह व पीएम नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद झाला असून दोघांनीही राज्याला मदतीचे आश्वासन दिल्याची माहिती दिली.

त्यानंतर त्यांनी या वादळाची तीव्रता व त्यानुसार प्रशासनाने अवलंबलेल्या मार्गांबद्दल सांगितले. सध्या लॉक डाऊन नियमांमध्ये काही शिथिलता देण्यात आली आहेत, मात्र आता पुढचे दोन दिवस या नियमातील सर्व गोष्टी बंद असणार आहेत. जिथे उद्योग-धंदे सुरु झाले आहेत, त्यांनी उद्या-परवा बंद ठेवावे, वादळ ज्या भागात आहेत, त्या ठिकाणी, किनारपट्टीच्या भागात कोणीही बाहेर पडू नये, मुंबईपासून रायगड सिंधुदुर्गापर्यंत सर्वांनी काळजी घ्यायची आहे. मच्छीमारांना परत बोलावण्यात आले आहे. अशावेळी घराभोवती इतःस्तत पसरलेल्या गोष्टी गोळा करून ठेवा. आवश्यकता नसल्यास विजेची उपकरणे वापरू नका, बॅटरीवर चालणारी उपकरणे चार्ज करू ठेवा, जेणेकरून वीज पुरवठा खंडित झाला तरी अडचण येणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी बीएमसीने नुकत्याच जारी केलेल्या काही सूचना वाचून दाखवल्या. त्यानंतर त्यांनी प्रशासन दक्ष असून त्यांनी सर्व उपाययोजना राबवल्या असल्याचे सांगितले. या वादळामुळे जर का जनतेला स्थलांतरीत होण्याची वेळ आलीच तर प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहनही त्यांनी केले. यासोबतच मुख्यमंत्र्यांनी बीकेसी रुग्णालयातील कोरोना व्हायरस रुग्णांना इतरत्र हलवण्यात आल्याची माहिती दिली. हे वादळ साधारण उद्या दुपारी मुंबईला धडकणार आहे, अशावेळी सरकार देत असलेल्या सूचनांकडे लक्ष द्या, खोट्या माहितीवर विश्वास ठेऊ नका. सरकार वादळाची दिशा पाहून सूचना करेल, असेही ते म्हणाले. (हेही वाचा: निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत संचारबंदी लागू; नागरिकांना समुद्रकिनारपट्टीवर जाण्यास बंदी)

शेवटी संवाद संपवताना त्यांनी, ‘कोरोनाचे संकट रोखून त्याला परतवण्याच्या मार्गावर आहोत, आता हे वादळाचे संकटही परतवून लावू. धैर्याने त्याचा सामाना करु, संकटाच्या छाताडावर पाय ठेवून ते परतवून लावू’, असे उद्गार काढले.