कुर्ला स्टेशनवर लिंबू पाणी (Photo Credit : Youtube)

होळी झाली, थंडी सरली. मुंबईमध्ये तर पारा 40च्यावर पोहचला. याकाळात हमखास सेवन केली जाणारी गोष्ट म्हणजे लिंबूपाणी. आता तुम्ही घरी असाल तर ठीक आहे, मात्र बाहेर असाल, लोकलने प्रवास करत असला तर स्टेशनवर लिंबूपाणी पिण्याशिवाय पर्याय नसतो. आता स्टेशनवरील पदार्थ म्हणजे ठीकच असणार कारण त्याला रेल्वेकडून मान्यता मिळाली असते, असा बऱ्याच लोकांचा समज असतो. मात्र हे तथ्य नाही. सध्या एका व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये स्टेशनवर एक व्यक्ती अतिशय घाणेरड्या प्रकारे लिंबू पाणी बनवत असलेला दिसत आहे.

मुंबईच्या कुर्ला स्थानकावर छप्पर बसविण्याचे काम सुरू असल्याने, पादचारी पुलावरून हा व्हिडीओ काढण्यात यश आले आहे. यामध्ये लिंबू पाणी बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यानेच लिंबू सरबत बनविणारा हात धुवत आहे. एका अस्वच्छ पाण्याच्या टाकीतून पाणी घेऊन तो लिंबू सरबत बनवत असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओमुळे आता प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत आहे.

या प्रकाराची माहिती स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर यांना मिळाली. त्यांनी लगेच स्टेशनवर जाऊन त्या व्यक्तीला याचा जाब विचारला, तसेच ही बाब रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. सध्या या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले असून, तोपर्यंत या दुकानाला टाळे ठोकण्यात आले आहे. यामध्ये मोठा आर्थिक दंड किंवा परवाना रद्द करण्यात येण्याची शिक्षा देण्यात येणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.