राज ठाकरेंचे व्यंगचित्र (Photo Credits: Twitter/Raj Thackeray)

ऐन दिवाळीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कुंचल्यांची जादू दाखवली. आपल्या व्यंगचित्रांच्या सिरीजमधून सध्याच्या सरकारवर ओढलेल्या ताशेऱ्यांमुळे भाजपच्या नेत्यांना चांगल्याच मिरच्या झोंबल्या. विविध सामाजिक प्रश्न आणि त्यावरील सरकारची भूमिका यांच्यावर आधारीत राज ठाकरेंची ही व्यंगचित्रे होती. आता परत एकदा राज ठाकरे एका नवीन मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत, आणि आपले विचार अगदी चपखलपणे त्यांनी व्यंगचित्रात मांडले आहेत. नरभक्षक वाघीण अवनीच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता, मात्र याबाबत राज्य सरकारने आपले हात वर केले. याच मुद्यावर राज ठाकरेंचे हे नवे व्यंगचित्र आहे.

राज ठाकरेंनी या व्यंगचित्रात आताची आणि भविष्यातील परस्थिती दर्शवली आहे. 2018 मध्ये सध्याच्या सरकारने अवनीचा बळी घेतला, यात देवेंद्र फडणवीस हातात बंदूक घेऊन उभे राहिलेले दिसतात.  मात्र 2019 मध्ये ही परिस्थिती पूर्णतः बदललेली दिसेल. त्यावेळी अवनीरुपी जनता या सरकारवर हल्ला करून भाजप नेत्यांचा माज उतरवणार आहे. या व्यंग्यचित्रासोबत राज ठाकरे यांनी सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनादेखील टॅग केले आहे.

अवनी या वाघिणीने पांढरकवडा, कळंब, राळेगाव या तीन तालुक्यांमध्ये धुमाकूळ घातला. अवघ्या काही महिन्यात एक-दोन नव्हे तर तब्बल 13 शेतकरी, शेतमजुरांची शिकार केली होती.