'प्रभू श्रीरामाचे विचार घेऊन माणुसकीचा सेतू बांधूया' राम मंदिर भूमिपूजनच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांचं ट्विट
NCP MLA Rohit Pawar | (Photo Credits: Facebook)

अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिर (Ram Mandir) भूमिपूजनाच्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. भव्य रांगोळ्या, रोषणाई, आकर्षक सजावट सर्वत्र पाहायला मिळत आहे. दरम्यान राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी श्रीरामची महती सांगणारे ट्विट केले आहे. रोहित पवार यांचे हे भले मोठे ट्विट लक्षवेधी ठरत आहे. 'प्रभू श्रीरामाचे विचार घेऊन माणुसकीचा सेतू बांधूया' असा संदेश रोहित पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून दिला आहे.

रोहित पवार यांनी ट्विटमध्ये लिहिले, "रामप्रहरापासून आपला दिवस सुरू होतो. जय जय राम कृष्ण हरी हा जगण्याचा मंत्र असतो. रामराम ही एकमेकांच्या ओळखीची खुण असते. साने गुरूजी म्हणायचे, 'रामराम म्हणताना तू ही राम आणि मी ही राम हे अपेक्षित असतं'. आपण पिढ्यान् पिढ्या असेच वागत आलो आहोत."

"राम आपला एकट्याचा नव्हता, तर तो सगळ्यांचा होता आणि राहणार. शेवटचा श्वास घेताना राम म्हणणाऱ्या गांधींजींचा राम, वारकऱ्यांना सामाजिक समता शिकवणारे ज्ञानदेव तुकाराम. आपल्याच शेतात अयोध्या समजून शेतात राबणारा एखादा सखाराम. राम सगळ्यांचा असण्यातच राम आहे," असे त्यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे.  तर पुढील ट्विटमध्ये रोहित पवार म्हणतात, "रामाने राम सेतू बांधला आपण प्रभू श्रीरामाचे विचार घेऊन माणुसकीचा सेतू बांधूया. जाती धर्माच्या बाबतीत भल्या भल्या पुरुषांच्या मर्यादा दिसून येतात निदान मर्यादापुरुषोत्तम रामाच्या बाबतीत असं होऊ नये. आजच्या या दिवशी श्रीरामाला एकच प्रार्थना, सबकों सन्मती दे भगवान!"

रोहित पवार ट्विट्स: 

आपल्या सर्वांच्या असण्यात राम आहे असं म्हणत रामाच्या विचारावर माणुसकीचा सेतू बांधुया असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन झाले आहे. भूमिपूजना दरम्यान राम मंदिरासाठी एकूण 9 शिळांचं पूजन करण्यात आलं. तर चांदीची वीट रचून पायाभरणी सोहळा संपन्न झाला.