Covid-19 Vaccination नियोजनातील विस्कळीतपणा टाळण्यासाठी रोहित पवार यांनी सूचवला 'हा' पर्याय
NCP MLA Rohit Pawar | (Photo Credits: Facebook)

राज्यात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव आणि अपुरी पडणारी आरोग्य व्यवस्था यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. यात लसींचा तुटवडा हे मोठे आव्हान सरकार समोर असताना असलेल्या लसी देताना नियोजनात झालेला विस्कळीतपणा यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याचे चित्र उभे राहिले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी एक पर्याय सुचवला आहे. यासाठी रोहित पवार यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांना टॅग करत ट्विट केले आहे.

रोहित पवार यांनी ट्विटमध्ये लिहिले, "राज्यात नागरिकांना दुसऱ्या शहरात किंवा तालुक्याबाहेरही लस घेता येत असल्याने त्या शहरातील किंवा तालुक्यातील नागरिकांची गैरसोय होते आणि नियोजनाच्यादृष्टीनेही विस्कळीतपणा येतो. त्यामुळं स्वतःच्याच शहरात किंवा तालुक्यात लस घेता येईल, असा निर्णय घेतल्यास लसीकरणाचं नियोजन सोपं होईल आणि नियोजनात विस्कळितपणा येणार नाही." त्याचबरोबर त्यांनी लस देण्याबाबत प्राधान्यक्रम ठरवता येईल का आणि लसीकरण केंद्रंही वाढवता येतील का, याकडे लक्ष देण्याची विनंती देखील केली आहे.

रोहित पवार ट्विट्स:

(जामखेडमध्ये खाजगी रुग्णालयात रेमडेसीवीर च्या तुटवट्यावर मात करत डॉक्टरांनी राबवली खास उपचार पद्धती; 'मॉडेल उपचार पद्धती' म्हणून विचार व्हावा यासाठी रोहित पवारांचे पत्र)

स्वतःच्याच शहरात किंवा तालुक्यात लस घेता येईल, असा निर्णय घेतल्याने नागरिकांची गेरसोय टाळता येईल आणि नियोजन सोपं होईल, असं रोहित पवारांचं म्हणणं आहे. तसंच केंद्रांकडून लस कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने लस देण्याबाबत प्राधान्यक्रम ठरव्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रोहित पवार यांच्या या पर्यायाचा राज्य सरकार कितपत विचार करते, हे येत्या काळात स्पष्ट होईल.