मुंबई: CAA  विरोधात 'गांधी शांती यात्रा'; शरद पवार, यशवंत सिन्हा सह बड्या नेत्यांची उपस्थिती
Gandhi Shanti Yatra | Photo Credits: Twitter/ ANI

CAA आणि NRC कायद्या विरोधात माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्त्वाखाली आज (9 जानेवारी) मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथून 'गांधी शांती यात्रा' ला सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी या यात्रेला हिरवा कंदील दाखवला आहे. दरम्यान या कार्यक्रमामध्ये प्रकाश आंबेडकर, पृथ्वीराज चव्हाण, आशिष देशमुख, नवाब मलिक हे मंत्री उपस्थित होते. तर या यात्रेचा शेवट दिल्ली मधील महात्मा गांधी स्मृतीस्थळ 'राजघाट' येथे होणार आहे.

वयाच्या 80 व्या वर्षात असणार्‍‍या वर्षी यशवंत सिन्हा यांनी काढलेल्या या यात्रेचं कौतुक केलं पाहिजे. ही लढाई मोठी आहे पण सरकार सहजासहजी ऐकेल असं वाटत नसल्याची भावना प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. तर शरद पवार यांनी आज देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे समाजातील मोठ्या वर्गात नाराजी आहे. त्यांना रस्ता दाखवणे गरजेचे आहे. त्यासाठी महात्मा गांधींचा सत्याग्रहाचा रस्ताच योग्य आहे. असे मत व्यक्त करत या यात्रेला हिरवा कंदील दाखवला आहे.

शरद पवार  Tweet

दरम्यान केंद्र सरकारने नागरिकत्त्व दुरूस्ती कायदा आणल्यानंतर ईशान्य भारतासह देशभरात आंदोलनं सुरू झाली आहेत. शरद पवारांनी या कायद्याला विरोध केला आहे. काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगाल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पत्राच्या माध्यमातून सरकार विरूद्ध विरोधकांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे.