Navy Day 2023: सिंधुदुर्ग किल्ल्यावर साजरा होणार यंदाचा नौसेना दिन; PM Modi पहिल्यांदा येणार सिंधुदूर्गात!
Narendra Modi | (Photo Credits: ANI/ Twitter)

भारतीय आरमाराचे जनक म्हणून शिवरायांकडे पाहिलं जातं. आजही त्यांचीच ही शिकवण आपल्या कामी येत आहे. त्यांच्या या विचारांसह यंदाचा नौसेना दिन (Navy Day 2023) साजरा करण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सिंधुदुर्गात (Sindhudurg) येणार आहेत. 4 डिसेंबर 2023 दिवशी मोदी सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्राँझ पुतळ्याचे अनावरण करत हा दिवस साजरा करणार आहेत. यानिमित्ताने मोदी पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्र आणि शिवप्रेमींसाठी यंदाचा नौसेना दिन खास असणार आहे.

शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, पद्मदुर्ग सारखे गडकिल्ले बांधले. शिवरायांचा दूरदृष्टीला सलाम करण्यासाठी यंदाचा नौसेना दिन सिंधुदुर्गावर साजरा केला जाणार आहे. 3 आणि 4 डिसेंबर असे दोन दिवस सिंधुदुर्गावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

1971 च्या भारत-पाक युद्धामध्ये भारतीय नौसेनेने पाकच्या कराची बंदरावर हल्ला केला आणि पाकला या युद्धात हार पत्करावी लागली होती. भारतीय नौसेनेच्या या कामगिरीची दाखल घेत 4 डिसेंबरला नौसेना दिन साजरा केला जातो.

सिंधुदुर्ग किल्ल्याची पायाभरणी 25 नोव्हेंबर 1664 साली करण्यात आली. हा स्वराज्यातील एक महत्त्वाचा सागरी किल्ला मानला जातो. 1 कोटी होन वापरून सिंधुदुर्ग किल्ला बांधल्याचं सांगितलं जातं. या किल्ल्याचे क्षेत्र सुमारे 48 एकर आहे आणि त्यांचा तट दोन मैल इतका आहे. या तटाची उंची 30 फूट तर रूंदी 12 फूट आहे. या किल्ल्याच्या तटास ठिकठिकाणी भक्कम असे 22 बुरुज आहेत.