Traffic | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

नवी मुंबई (Navi Mumbai) मध्ये ट्राफिक विभागाकडून रस्त्याच्या काँक्रिटीकरणच्या (Concreting) कामासाठी ठाणे-बेलापूर रोड (Thane -Belapur Road) 14 मेच्या मध्यरात्रीपर्यंत पूर्णबंद बंद ठेवला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. आयकिया जवळ रस्त्याचे काम असल्याने पुढील काही दिवस नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रस्त्याचे हे काम सध्या नवी मुंबई महानगरपालिकेकडून ( Navi Mumbai Municipal Corporation) हाती घेण्यात आले आहे.

नवी मुंबई ट्राफिक अ‍ॅडव्हायजरी

रस्त्याच्या कामामुळे सध्या सविता केमिकल ते तुर्भे रेल्वे स्टेशन पर्यंतचा रस्ता वाहतूकीसाठी काही विशिष्ट काळासाठीच सुरू ठेवला जाणार आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आता पर्यायी मार्ग सूचवण्यात आले आहेत. हलक्या वाहनांना महापे येथील अग्निशमन दलाच्या सिग्नलवरून वळून जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यानंतर सेक्टर 26 एपीएमसी आणि पाम बीच रोडवरून पुढे जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

अवजड वाहनांसाठी, दोन मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. वाहनचालक अग्निशमन दलाच्या सिग्नलवरून डावीकडे वळून तुर्भे एमआयडीसी परिसरातून जाऊ शकतात किंवा सविता केमिकल पुलाखाली डावीकडे वळून त्याच एमआयडीसी मार्गाचा वापर करू शकतात.

नवी मुंबईतील पायाभूत सुविधा वाढवण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या मोठ्या नागरी उपक्रमांचा  एक भाग म्हणून हा रस्ता बंद करण्यात येत आहे. ठाणे-बेलापूर रोड सारख्या जास्त रहदारी असलेल्या क्षेत्रांना प्राधान्य देत, नवी मुंबई महानगरपालिका मान्सूनपूर्व रस्ते मजबूतीकरण आणि पुनर्बांधणी उपक्रम हाती घेत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला कामाचे वेळापत्रक ठरवून, अधिकाऱ्यांचा उद्देश पावसाळा सुरू होण्यापूर्वी काँक्रिटीकरण पूर्ण करणे, रस्त्यांचे नुकसान होण्याचा धोका कमी करणे आणि दीर्घकालीन टिकाऊपणा सुनिश्चित करणे आहे.