झाडांच्या फांद्याची छाटणी करत असताना विद्यूत तारेचा धक्का (Electrocuted ) बसून एका 45 वर्षीय कामगाराचा जागीच मृत्यू झाला आहे. नवी मुंबई (Navi Mumbai) येथील एका सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या आवारात पावसाळ्यापूर्वी झाडांची छाटणी सुरु होती. या वेळी गौतम गरीब यादव नावाचा कामगार झाडावर चढून फांदी कापत असताना कामगाराच्या हातातील लोखंडी करवत चुकून विद्यूत तारेला चिकटला असता ही घटना (11 जून) घडली. या घटनेत गौतम याचा जागीच मृत्यू झाल्याचे त्याच्या एका सहकाऱ्याने सांगितले.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, विद्यूत धक्का बसून मृत्यू झाल्यावर गौतम यादव यांचा मृतदेह झाडावर पडला. जवळपास पुढचे दोन तास हा मृतदेह तसाच लटकून होता. गौतम यादव यांचा सहकारी प्रवीण भोइंबर यांनी वाशी पोलिसांना घटनेची तक्रार दिली आहे. प्राप्त तक्रारीवरुन पोलिसांनी न्यू अलकनंदा को-ऑप सोसायटीचा सुपरवायझर आणि पदाधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. ही गृहनिर्माण संस्था, एमजी कॉम्प्लेक्स, नवी मुंबई येथे आहे. (हेही वाचा, Mumbai: पावसाळ्यापूर्वी झाडांची छाटणी करण्यासाठी बीएमसीची कारवाई, पाच हजार सोसायट्यांना पाठवली नोटीस)
प्रवीण भोइंबर यांनी सांगितले की, आम्हाला संबंधित सोसायटीकडून आवारातील झाडांच्या फांद्या छाटण्याबाबत 7 जून रोजी बोलावले होते. कामावर पोहोचल्यावर आम्ही सोसायटीचे पर्यवेक्षक भरतमुन पाली यांना महापालिकेच्या परवानगीची झेरॉक्स प्रत मागितली. पण त्यांनी ती दिली नाही. त्यांनी तुम्ही काम सुरु करा बाकीचे आम्ही (सोसायटी) पाहून घेईल असे म्हटले.
प्रवीण भोइंबर यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितले की, गौतम गरीब यादव यांच्यासह आम्ही चार कामगारांनी सोसायटी आवारातील झाडे कापण्याचे काम सुरु केले. दरम्यान, 10 जून रोजी गौतम यादव यांनी सोसायटी सुपरवायझरला सांगितले की, सोसायटी आवारात झाडाच्या फांद्याजवळून इलेक्ट्रीक वायर जात आहे. त्यामुळे आपण झाडावर चढणार नाही. झाडावर चढल्यास शॉक लागू शकतो. परंतू, परंतु पर्यवेक्षकाने (सुपरवायझर) यादवला त्याच्या इच्छेविरुद्ध झाडावर जाण्यास भाग पाडले. काम पूर्ण केले नाही तर त्याचा चेक क्लिअर केला जाणार नाही, अशी धमकी त्याला देण्यात आली.