बहुप्रतीक्षित नवी मुंबई मेट्रो लाईन-1 (Navi Mumbai Metro Line-1) प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे, मात्र फक्त उद्घाटनामुळे त्यास विलंब होत आहे. आता येत्या 30 ऑक्टोबर रोजी नवी मुंबईच्या मेट्रो लाईन-1 चे होणारे उद्घाटन पुन्हा अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पाचे उद्घाटन करणार होते. या समारंभाची संपूर्ण तयारी झाली होती मात्र आता हा समारंभ पुढे ढकलला आहे.
उद्घाटन समारंभ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे ठिकाण निवडण्यात आले होते. मात्र नवी मुंबई मेट्रोच्या उद्घाटनाला पंतप्रधान कार्यालयाकडून तारीख पे तारीख दिली जात आहे. उद्घाटनासाठी एकाच महिन्यात पंतप्रधानांच्या चार वेळा तारखा जाहीर करून पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
शहर आणि औद्योगिक महामंडळ विकास (सिडको) प्रवाशांची सुरक्षा आणि मेट्रो प्रणालीची एकूण तयारी सुनिश्चित करण्यासाठी सक्रिय होते. सिडकोने अधिकृतपणे महामेट्रोशी संवाद साधून, त्यांना प्रवाशांच्या सुरक्षेवर विशेष लक्ष केंद्रित करून तयारी पूर्ण करण्याचे आवाहन केले होते. सिडकोने अभियंत्यांची एक समर्पित टीम तैनात करून, सर्व मेट्रो स्थानकांची बारकाईने तपासणीदेखील केली होती. (हेही वाचा: Mumbai CSMT–Madgaon Vande Bharat Express आता 1 नोव्हेंबरपासून सहा दिवस धावणार)
यापूर्वी, हा उद्घाटन समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 15 ते 17 ऑक्टोबर दरम्यानच्या दौऱ्यासाठी नियोजित केला होता, परंतु तो पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर 30 ऑक्टोबर रोजी उद्घाटनाची तारीख निश्चित केली गेली मात्र ती देखील पुढे ढकलली आहे. पंतप्रधानांचा 30 ऑक्टोबरचा संभाव्य दौरा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून राज्य शासनाला प्राप्त झाली आहे.
याआधी1 मे 2011 रोजी नवी मुंबई मेट्रोचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले होते. नवी मुंबईच्या या मेट्रो 1 मार्गिकेमध्ये 11 स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये सीबीडी-बेलापूर, सेक्टर 7, सिडको सायन्स पार्क, उत्सव चौक, खारघर सेक्टर 11, खारघर, सेक्टर 14, खारघर सेंट्रल पार्क, पेठपाडा, खारघर सेक्टर 34, पाचनंद आणि पेंधर-तळोजा अशी स्थानके आहेत.