त्र्यंबकेश्वरचे माजी नगराध्यक्ष धनंजय तुंगार यांची भरदिवसा गळा चिरून हत्या
Representational Image (Photo Credits: Twitter)

नाशिकमध्ये (Nashik)  त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar)  आज दिवसाढवळ्या एका हत्येने हादरलं आहे. दरम्यान आज (21 ऑक्टोबर) त्र्यंबकेश्वरचे माजी नगराध्यक्ष धनंजय यादवराव तुंगार (Dhananjay Tungar) यांची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती दिली आहे. या हत्येमागील नेमकं कारण अजून समोर आलेले नाही.नक्की वाचा: पुण्यातील वकिलाचे अपहरण करून हत्या करणाऱ्या 3 आरोपींना अटक.

महाराष्ट्र टाईम्सच्या वृत्तानुसार, धनंजय तुंगार यांचे भाऊ शेखर यांच्या निधनानंतर 12 व्याचे विधी सुरू होते. दरम्यान त्यांना फोन आला. नंतर ते अहिल्या धरणाकडे गेले. याठिकाणी दबा धरून बसलेल्या गोणदके नावाच्या एका तरूणाने धनंजय तुंगार यांच्यावर वार केले. सुर्‍याच्या मदतीने हे वार त्यांच्या गळ्यावर करण्यात आले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या धनंजय यांचा मृत्यू झाला आहे. दिवसाढवळ्या अशी हत्या झाल्याने त्र्यंबकेश्वर मध्ये खळबळ माजली आहे. काही वेळातच ही बातमी वार्‍यासारखी शहरामध्ये पसरली आहे. पोलिसांसोबतच ग्रामस्थांनीही घटनास्थळी धाव घेतली आहे.

सुरूवातीला कॉंग्रेस पक्षामध्ये असलेल्या धनंजय तुंगार यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला होता. त्यांनी अपक्ष म्हणून देखील निवडणूक लढली होती. सध्या ते राजकारणापासून लांब होते. धनंजय तुंगार हे 2 वेळेस त्र्यंबकेश्वर चे नगराध्यक्ष राहिले आहेत.