Nashik City Link Bus

आज सकाळ पासून नाशिक महानगर पालिकेची सिटीलिंक बससेवा ही ठप्प झाली आहे. वेतन मिळण्यास उशीर होत असल्याची तक्रार करत वाहकांनी संपाचे हत्यार उपसले आहे. ही बससेवा अचानक बंद झाल्याने याचा फटका अनेक विद्यार्थी तसेच कामावर जाणाऱ्या लोकांना बसला. अनेक शाळा व महाविद्यालयांत परीक्षा सुरू आहेत. परीक्षेला वेळेत पोहोचण्यासाठी त्यांना धावपळ करावी लागली.

सिटीलिंक प्रशासनाच्या काही अटी-शर्ती कर्मचाऱ्यांना मान्य नाहीत. या संदर्भात वाहकांनी कामगार उपायुक्तांकडे दाद मागून संपाची नोटीस दिलेली आहे. तथापि, वाहकांनी त्या तारखेपर्यंत काही तोडगा निघेल, याची प्रतीक्षा न करताच अकस्मात संप सुरू केल्याचे सिटीलिंकच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे विद्यार्थी व शहरवासीय वेठीस धरले गेले. वाहकांच्या कार्यपध्दतीबाबत पोलिसात तक्रार देण्याची तयारी सिटीलिंकने केली आहे.

सिटी लिंकच्या सुमारे 250 बसेस शहर व ग्रामीण भागात सेवा देतात. गुरूवारी अनेक शाळांमध्ये वार्षिक परीक्षेचा शेवटचा पेपर होता. सकाळी विविध थांब्यांवर विद्यार्थी बराच वेळ बसची प्रतीक्षा करीत होते. संपाची माहिती मिळाल्यानंतर त्यांना पर्यायी व्यवस्थेने शाळा व महाविद्यालयात पोहोचण्यासाठी कसरत करावी लागली. काहींना पेपरला वेळेत पोहोचता आले नसल्याचे सांगितले जाते. तपोवन आगारात सिटीलिंकच्या शेकडो बसेस उभ्या होत्या.