Drown | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सुरक्षा ताफ्यात तैनात असलेला महाराष्ट्रातील एक केंद्रीय राखुव सुरक्षा दलातील जवान कालव्यात बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. गणेश गीते (Ganesh Gite) असं या जवानाचं नाव आहे. शिर्डीच्या साईबाबा मंदिरातून (Shirdi Saibaba Mandir) दर्शन घेऊन घरी परतत असताना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला आणि त्यामध्ये ते कालव्यात पडून बेपत्ता झाले.

नाशिकच्या सिन्नर तालुक्यामध्ये गोदावरी कालव्यात तो वाहून गेला आहे. पत्नी आणि मुलांसह शिर्डीला गेलेले दुचाकी वरून घरी परतत होते. चोंढी शिवारात त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. त्यानंतर ते गोदावरीच्या कालव्यामध्ये पडले. स्थानिकांना या अपघाताची माहिती मिळताच त्यांनी तातडीने धाव घेतली. यामध्ये पत्नी आणि मुलांना वाचवण्यात यश आले पण गणेश गीते वाहून गेले. मोटरसायकलच्या पुढे टाकीवर बसलेल्या लहान मुलीचा पाय हँडल मध्ये अडकल्याने गाडीचा तोल जाऊन हे सर्वजण नाल्याच्या पाण्यात पडले. गणेश यांनी बायको, मुलगा आणि मुलीला पाण्यातून बाहेर काढले. मात्र ते स्वतः पाण्यात वाहून गेले. 20 तासांच्या शोधमोहिमेनंतर त्यांचा मृतदेह ताब्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. कॅनॉलचे पाणी थांबवले असते तर मृतदेह लवकर मिळाला असता असा गावकऱ्यांचा आरोप आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या विशेष पथकात असलेले गणेश गीते 24 फेब्रुवारीला सुट्टीवर आले होते. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री दादा भुसे यांनी तिथे धाव घेतली.