Nair Hospital Molestation Complaints: कोलकाता येथील रुग्णालयात एका प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. अजूनही या प्रकरणाचा तपास सुरु आहे. आता मुंबईच्या नायर हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने सहयोगी प्राध्यापकाविरुद्ध लैंगिक छळाचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर याबाबत कारवाई करत, महापालिका प्रशासनाने संबंधित सहयोगी प्राध्यापकाला निलंबित केले आहे. रुग्णालय स्तरावरील लैंगिक छळ प्रतिबंधक समितीने या प्रकरणाची चौकशी केली. याशिवाय अंतर्गत तक्रार समिती आणि सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्र समितीनेही हे प्रकरण गांभीर्याने घेतले.
आता माहिती मिळत आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) संचालित नायर रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयातील विनयभंगाच्या तक्रारींची गंभीर दखल घेत पीडितांना न्याय मिळावा यासाठी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. आजपर्यंत या प्राध्यापकाविरुद्ध सुमारे 10 तक्रारी दाखल झाल्या आहेत.
विनयभंगाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी नायर रुग्णालयाच्या डीनची बदली-
मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना रुग्णालयाच्या डीनची तात्काळ बदली करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एका विशेष समितीची स्थापना करण्यात येणार आहे.
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) October 1, 2024
शिंदे यांनी बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांना सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या डीन सुधीर मेढेकर यांच्या बदलीचे आदेशही त्यांनी दिले आहेत. ‘या तक्रारी गंभीर आहेत. आम्ही अधिक तपास करू. हॉस्पिटलमध्ये सुरक्षित वातावरण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,’ असे शिंदे म्हणाले. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एका विशेष समितीची स्थापना करण्यात येणार आहे. बीएमसीने मेढेकर यांच्या जागी कूपर हॉस्पिटलचे डीन शैलेश मोहिते यांची नियुक्ती केली आहे. कोलकाता बलात्काराची घटना आणि बदलापूर बलात्कार प्रकरणावर झालेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकार अशी प्रकरणे गंभीरपणे घेत आहे. (हेही वाचा: Mumbai Shocker: अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण, कोचिंग सेंटर चालवणाऱ्या तीन भांवावर गुन्हा दाखल, मुंबईतील धक्कादायक घटना)
सुप्रिया सुळे यांची पोस्ट-
Shocking! It has come to my notice that women doctors who have raised their complaints about sexual harassment at Nair Hospital are being silenced.
Despite them requesting to be heard, government authorities are turning a blind eye to this entire issue safeguarding the…
— Supriya Sule (@supriya_sule) September 27, 2024
याआधी खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणाबाबत आवाज उठवला होता. त्या म्हणाल्या होत्या, ‘नायर रुग्णालयात लैंगिक छळाच्या तक्रारी करणाऱ्या महिला डॉक्टरांना गप्प केले जात असल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची विनंती करूनही, सरकारी अधिकारी आरोपींना वाचवण्यासाठी या संपूर्ण प्रकरणाकडे डोळेझाक करत आहेत. हा मुद्दा मी आधीही मांडला होता. आम्ही त्वरित कारवाईची मागणी करतो, कारण प्रत्येक दिवसाचा विलंब आमच्या महिलांच्या सुरक्षिततेला गंभीरपणे धोक्यात आणत आहे. राज्यात अनेक धक्कादायक घटना घडूनही सरकार केवळ मूकच नाही तर निष्क्रियतेची ढाल करत आहे, हे भयावह आहे.’