मर्डर मिस्ट्री: नवरा गेला लग्नाला, दुसरीने काढला तिसरीचा काटा; पहिल्या पत्नीच्या मुलीच्या बॉयफ्रेंडचीही मिळाली साथ; चार आरोपींना अटक
Murder Mystery at Nala Sopara in Mumba | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Murder Mystery at Nala Sopara in Mumbai: कल्पनेच्या जोरावर रचलेल्या मर्डर मिस्ट्री (Murder Mystery) सिनेमातील कथानकालाही मागे टाकेल अशी धक्कादायक आणि तितकीच गुंतागुंतीची घटना मुंबईतील नालासोपारा (Nala Sopara) येथे घडली आहे. एका नवऱ्याच्या क्रमांक दोनच्या पत्नीने त्याच्या क्रमांक तीनच्या पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. योगिता देवरे (वय-45) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. या हत्या प्रकरणात दुसऱ्या पत्नीला नवऱ्याच्या क्रमांक एकच्या (पहिली) पत्नीच्या दोन मुली आणि या दोन मुलीपैकी एकीचा बॉयफ्रेंड शैलेश काळे याची साथ मिळाली. पोलिसांनी या प्रकरणात चार आरोपींना अटक केले आहे.

पोलिसांकडून प्रसारमाध्यमांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार, सुशील मिश्रा नामक एक व्यक्ती नालासोपारा येथे राहतो. प्राप्त माहितीनुसार त्याने एकूण तीन लग्नं केली आहेत. त्यापैकी मुळची पत्नी (क्रमांक एक) ही उत्तर प्रदेश येथे गावीच राहते. सुशील पासून तिला दोन मुली जन्मल्या. त्या सुशील सोबत मुंबई (नालासोपारा) येथे राहतात. तर, सुशील दुसरी पत्नी पार्वती माने हिच्यासोबत राहतो. म्हणजेच सुशील मिश्रा, पार्वती माने आणि क्रमांक एकच्या पत्नीच्या दोन अल्पवयीन मुली असे चार लोक एकत्र राहात होते. दरम्यान, सुशील मिश्रा याने तिसरे लग्न केले. योगिता देवरे असे त्याच्या तिसऱ्या पत्नीचे नाव होते. सुशीलने तिसरे लग्न केले हे त्याच्या क्रमांक दोनच्या पत्नीला (पार्वती माने) आवडले नाही. त्यातच तिसरे लग्न झाल्यापासून सुशील मिश्रा हा योगिता देवरे हिच्यासोबत अधिक वेळ घालवतो. आपल्याला फार वेळ आणि महत्त्व देत नाही हा राग पार्वतीच्या मनात होता. यातूनच तिने सुशीलच्या क्रमांत तिनच्या पत्नीचा (योगिता देवरे) हिचा काटा काढण्याचे ठरवले. या कटात तिला सुशीलच्या पहिल्या पत्नीच्या (क्रमांक एक) दोन अल्पवयीन मुली आणि त्यातील एकीच्या बॉयफ्रेंडची साथ मिळाली.

दरम्यान, सुशील मिश्रा हा अहमदाबाद येथे एका विवाहासाठी गेला. ही संधी साधून पार्वतीने रचलेला कट आमलात आणण्याचे ठरवले आणि ती कामाला लागली. पार्वती, दोन अल्पवयीन मुली आणि त्यातील एकीचा बॉयफ्रेंड असे चौघे मिळून योगिता राहात असलेल्या इमारतीजवळ पोहोचले. इमारतीत प्रवेश करण्यास सुरक्षारक्षाने मज्जाव केला. मात्र, त्याला दारुचे अमिष दाखवताच त्याचा विरोध मावळला. या चौघांनी इमारतीच्या फाटकातून आत येत योगिताच्या फ्लॅटचा दरवाजा नकली चावीने उघडला. योगिता घरात झोपली होती. झोपलेल्या योगिताचा या चौघांनी मिळून ओढणीने गळा आवळला. योगिताचा मृत्यू झाला.

योगिता देवरे हिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी शैलेश काळ याने नीरज मिश्रा याला फोन केला आणि रिक्षा आणण्यास सांगितले. नीरज मिश्रा हा सुद्धा त्या दोन मुलींपैकी मोठ्या मुलीचा बॉयफ्रेंड असल्याचे समजते. योगिताला बरे वाटत नसून तिला दवाखाण्यात न्यायचे आहे, त्यामुळे तू पटकण रिक्षा घेऊन ये असे सांगून रिक्षा बोलविण्यात आली. आरोपींनी योगिताच्या मृतदेहाला चादर गुंडाळून तो अज्ञात ठिकाणी नेऊन पुरला. दरम्यान, पोलिसांना एका महिलेचा मृदतेह सापडल्याची माहिती एक मार्चला मिळाली. (हेही वाचा, मुंबई: सेक्स करण्यास नकार दिल्याने मॉडेलची हत्या, मानसी दीक्षित खून प्रकरणात धक्कादायक खुलासा)

मृतदेहाची हत्या झाली असावी असे स्पष्ट जाणवत होते. मात्र, खुन्यापर्यंत पोहोचायचे कसे हा पोलिसांसमोर सवाल होता. पोलिसांनी परीसरातील सीसीटीव्ही तपासले. दरम्यान, एका इमारतीजवळ ‘जान्हवी’ असे लिहिलिलेली रिक्षा थांबल्याचे दिसले. परंतू 'जान्हवी' रिक्षापर्यंत पोहोचायचे कसे असा विचार करतानाच पोलिसांनी परिसरातील सुमारे 4000 हजार रिक्षावाल्यांची चौकशी केली. अखेर एका ज्या रिक्षातून योगिताचा मृतदेह नेण्यात आला त्या रिक्षाचा तपास लागला. आणि पुढील सर्व प्रकरणाचा उलघडा झाला. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली.