प्रातिनिधिक प्रतिमा

मुंबईमध्ये वाहतुकीचे अनेक पर्याय उपलब्ध असले तरी, काळ्या-पिवळ्या टॅक्सी या मुंबईकरांच्या जीवनाचा मुख्य घटक आहेत. तब्बल 10 दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी चाललेला ओला-उबरचा संप आता मिटला असला तरी, त्या काळात या टॅक्सींंनी मुंबईमधील गरजूंना तारले होते. मुंबईमध्ये असे अनेक लोक आहेत जे विविध कारणांमुळे अॅप बेस्ड  टॅक्सी सर्व्हिस ऐवजी या काळ्या पिवळ्या टॅक्सींंना प्राधान्य देतात. मात्र आता जे लोक या टॅक्सींंवर अवलंबून आहेत अशांना वाहतुकीच्या नव्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते कारण, 5 हजार काळ्या पिवळ्या टॅक्सींचे परवाने नुतनीकरण न झाल्यास दिवाळीनंतर, 15 नोव्हेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यासमोर काळ्या पिवळ्या टॅक्सींंसह आंदोलन करण्याची धमकी टॅक्सीचालकांनी दिली आहे.

ज्या टॅक्सींंनी 25 वर्षे पूर्ण केले आहेत त्यांना रस्त्यावरुन बंद करण्याचा आदेश याआधीच वाहतूक विभागाने दिला आहे. मात्र या विरोधात वाहतूक संघटनांनी आवाज उठवला होता त्यातून तोडगा म्हणून वाहतूक विभागाकडून जुन्या टॅक्सींंना फिटनेस प्रमाणपत्र आणि परवाना नूतनीकरण करणे बंधनकारक केले आहे. मात्र, हे फिटनेस प्रमाणपत्र सेंट्रल, पूर्व, पश्चिम आणि बोरीवली येथील वाहतूक कार्यालयातून देणे बंद केले आहे. त्यासाठी टॅक्सीचालकांना मुंबई बाहेरच्या वाशी, पनवेल आणि ऐरोली येथील कार्यालयात जाण्यास सांगण्यात येते. तसेच हे फिटनेस प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आणि परवाना नूतनीकरण अनेक जाचक अटींची पूर्तताही करावी लागते. यामुळे त्रस्त झालेल्या वाहन चालकांनी ही प्रक्रिया सुलभ न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर धडक मारण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे.