Coronavirus Outbreak (Photo Credits: AFP)

सध्या भारतात, कोरोना विषाणूची (Corona Virus) लागण झालेल्या लोकांची संख्या वाढत आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यात परदेशी रुग्णांसह 81 लोकांमध्ये या संसर्गाची पुष्टी झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) देखील कोरोना विषाणूला ‘साथीचा रोग’ जाहीर केला आहे. आरोग्य मंत्रालयाने या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी, देशभरात 52 चाचणी केंद्रे सुरू केली आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग वेगवेगळ्या प्रदेशात असलेल्या या चाचणी केंद्रांवर केला जाऊ शकतो. अशात मुंबईमधील (Mumbai) 8 हॉस्पिटलमध्ये संशयित आणि पुष्टी झालेल्या लोकांना वेगळे ठेवण्यासाठी 233 बेड्सची व्यवस्था केली गेली आहे.

कोरोनाशी लढण्यासाठी तसेच याचा संसर्ग रोखण्यासाठी नुकतेच महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आज रात्रीपासून मुंबई, पुणे, नागपूर, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, ठाणे इत्यादी ठिकाणी शाळा, कॉलेज, जिम, जलतरण केंद्र, पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्यात येणार आहेत. राज्याची राजधानी मुंबईदेखील या विषाणूशी दोन हात करण्यासाठी तयार होत आहे.

मुंबई मध्ये खालील हॉस्पिटल्समध्ये कोरोना विषाणूसाठी आयसोलेशन बेड्सची सुविधा उपलब्ध असेल –

> कस्तुरबा हॉस्पिटल – 78 बेड्स

> एचबीटी (HBT) हॉस्पिटल – 20 बेड्स

> कुर्ला भाभा हॉस्पिटल – 10 बेड्स

> बांद्रा भाभा हॉस्पिटल – 10 बेड्स

> राजवाडी हॉस्पिटल – 20 बेड्स

> बीपीटी (BPT) हॉस्पिटल – 50 बेड्स

> बाबसाहेब आंबेडकर सेन्ट्रल रेल्वे हॉस्पिटल – 30 बेड्स

एकूण – 233 बेड्स

(हेही वाचा: पुणे, पिंपरी येथील शाळा बंद राहणार; कोरोना व्हायरस बाबतचे निर्णय आज मध्यरात्रीपासून लागू होणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे)

दरम्यान, देशात कोरोनाचे 81 रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्यमंत्रालयाकडून देण्यात आली आहे.  महाराष्ट्रात कोरोना व्हायरस संक्रमण झालेल्यांची संख्या 17 वर पोहचली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, राज्यातील सरकारच्या वतीने कंपन्यांना विनंती केली आहे की, शक्य असल्यास कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची परवानगी द्या. तसेच ज्या व्यक्तींनी 15 फेब्रुवारी नंतर चीन, दक्षिण कोरिया, इटली, फ्रान्स, जर्मनी, स्पेन आणि इराण या 7 देशांना भेट दिली असेल आणि आज संध्याकाळी 5.30 नंतर देशात विमानाने येतील त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.