सध्या डिसेंबर महिना अर्धा संपला तरी मुंबईकरांना मात्र थंडीची चाहुल लागली नव्हती. मात्र मुंबईमध्ये मंगळवारी किमान तापमान 20.5 अंशांपर्यंत खाली उतरले आणि मुंबईकरांना थंडीचा जाणीव झाली. राज्यामध्ये इतरत्र 20 अंशांखाली किमान तापमान असताना देखील मुंबईत मात्र तापमानात घट झालेली पहायला मिळाले नव्हते. मुंबईत अजूनही कमाल तापमानाचा पारा 30 अंशांच्या वर असल्याने दिवसा जाणवणाऱ्या थंडीसाठी मुंबईकरांना आणखी प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. (हेही वाचा - Weather Update: 'या' राज्यांमध्ये पावसाची हजेरी, उत्तर भारतात थंडीची लाट; वाचा हवामान विभागाचा अंदाज)
मुंबईच्या तापमानात सध्या घट झालेली पहायला मिळत आहे. सांताक्रूझ येथे मंगळवारी 20.5 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले. हे तापमान सोमवारपेक्षा 1.1 अंशांनी कमी होते. मात्र अजूनही किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा 1.9 अंशांनी अधिक आहे. कुलाबा येथे किमान तापमान 23 अंश सेल्सिअस होते. यावरुन असे लक्षात येते की उपनगरात पहाटे जाणवणारा गारवा हा दक्षिण मुंबईत जाणवत नाही आहे. पुढील काही दिवसाता मुंबईच्या तापमानात किंचीत घट होऊन थंडीचा अनुभव मुंबईकराना मिळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्यात थंडीचा अनुभव हा सर्वत्र होत असताना मात्र मुंबईत अद्याप म्हणावी तेवढी थंडी नाही आहे. सध्या बुधवारी 21 अंशांपर्यंत किमान तापमान असू शकेल, तर त्यानंतर पुन्हा 22 ते 23 अंशांदरम्यान किमान तापमानाचा पारा राहील, असा अंदाज आहे. कमाल तापमानही बुधवारी 34 अंशांपर्यंत चढून त्यानंतर 32 ते 33 अंशांदरम्यान असेल, असा अंदाज आहे.