घाटकोपर: अंतर्गत वादातून बर्थ डे दिवशीच मित्राची निर्घृण हत्या; पार्कमध्ये केले सपासप वार
Image used for represenational purpose (File Photo)

मुंबईमध्ये पूर्ववैमन्यस्यातून 27 वर्षीय तरूणाचा त्याच्या वाढदिवसादिवशीच हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घाटकोपर येथे घडला आहे. घाटकोपरच्या पंतनगर परिसरामध्ये हा प्रकार घडला आहे. नितेश सावंत असं मृत तरूणाचं नाव असून सुमारे 7-8 जणांनी त्याच्यावर साईबाबा गार्डनमध्ये सपासप वार करून तेथून पळ काढला. स्थानिकांनी नितेशला जवळच असलेल्या राजावाडी रूग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं आहे. या घटनेनंतर या परिसरात खळबळ पसरली आहे. सध्या फरार आरोपींचा तपास सुरू असून ही घटना वादातून झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार नितेश सावंतचा रविवार, 28 जुलैला वाढदिवस होता. नितेश पार्कामध्ये आपला वाढदिवस साजरा करत होता. या सेलिब्रेशन दरम्यान मित्रांनी नितेशवर वार केले आहे. काही दिवसांपूर्वी नितेश आणि त्याच्या मित्रांमध्ये वाद झाले होते. या वादाचा राग त्यांच्या मनात होता. या रागातूनच नितेशचा विषय कायमचा संपवण्याचा निर्णय घेण्यात आला. नितेशच्या बर्थ डे सेलिब्रेशनचं औचित्य साधून त्याला पार्कमध्ये बोलावण्यात आलं तेथेच त्याच्यावर वार करण्यात आले आहे.

ANI Tweet

पोलिसांनी नितेशच्या खूनाप्रकरणी 2-3 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी केली जाणार आहे. घाटकोपर परिसरात मागील आठवड्याभरात ही हत्येची दुसरी घटना असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भीती आहे.