Water | representative pic- (photo credit -pixabay)

मुंबईला पाणीपुरवठा (Mumbai Water Supply) करणाऱ्या धरणांमध्ये 10.67% पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती देण्यात आली आहे. कडाक्याच्या उन्हाळ्यात यंदा मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन झाले आहे परिणामी जलसाठ्याने लवकर तळ गाठला आहे. अशा स्थितीत आता पाणीकपात करावी लागेल तेव्हा नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन बृहन्मुंबई महापालिका जल विभागाने केले आहे.

रिपोर्टनुसार, बीएमसी कडून येत्या 2-3 दिवसात मुंबईतील पाणीसाठ्याचा आढावा घेणार आहे. त्यानंतर पाणीकपातीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. मुंबईला वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या 7 धरणामधून पाणीपुरठा केला जातो. सध्या या सातही धरणातील पाणीसाठ्याची पातळी कमालीची खालावली आहे. या सातही धरणांचा एकत्र मिळून १ लाख ५४ हजार ४७१ दक्षलक्ष लिटर पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात हाच पाणीसाठा १६.४३ टक्के होता. त्यामुळे मुंबईकरांवर आता पाणीकपातीचं संकट आहे.

मुंबई वर पाणी कपातीचं संकट?

राज्य सरकारने यंदा मुंबईकडे असलेला कमी पाणीसाठा पाहून भातसा आणि अप्पर वैतरणा जलाशयातून अतिरिक्त पाणीसाठा देण्यास मंजुरी दिली आहे. दरवर्षीप्रमाणे 31 जुलैपर्यंत मुंबईला पाणीसाठा पुरेल, अशा रीतीने उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन पालिकेनं केलं आहे. दरम्यान जून महिन्यात 10,11 जून पर्यंत मान्सून दाखल होण्याचा अंदाज आहे. पण जून महिन्यात पडणार्‍या पावसावर पाणीसाठा अवलंबून नसल्याने आता नागरिकांनी पाणी वापरात काटकसर करावी असं आवाहन करण्यात आलं आहे.