मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या धरणातील पाणीसाठी दिवसेंदिवस कमी होत चालला आहे.
मुंबई (Mumbai) करांची तहान भागवणाऱ्या धरणांतील (Dam) पाणीसाठा झपाट्याने तळ गाठू लागला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मध्य वैतरणा धरणातील पाणीसाठा 10.75 टक्क्यांवर आला आहे, तर राज्यातल्या सुमारे तीन हजार धरणांमधील पाणीसाठा (Water Storage) 29 टक्क्यांवर आला आहे. मान्सून (Monsoon) महाराष्ट्रासह देशात दाखल व्हायला अवकाश आहे. राज्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली असली तरी मुंबई आणि परिसर मात्र कोरडाठाक आहे. यामुळे पाऊस आणखी रखडल्यास जून महिन्यात मुंबईला पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा आणि भातसा धरणातूनअधिकचे पाणी मिळावे यासाठी महापालिकेने दोन महिन्यांपूर्वी राज्य सरकारला पत्र लिहिलं होतं. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी मध्य वैतरणा या धरणात 10.75 टक्के, तर वैतरणा धरणात 29.91 टक्के, भातसा धरणात 32.48 टक्के, मोडक सागर धरणात 47.98 टक्के तर तानसा धरणात 36.99 टक्के पाणीपुरवठा सध्या उपलब्ध आहे.
राज्यासह मुंबईत मान्सूनचे आगमन विलंबाने होणार असून मुंबईत मात्र तापमानाचा पारा चढाच असून उकाडा कायम आहे. मुंबईचे कमाल तापमान 34 अंशांवर स्थिर आहे. शहरातील आर्द्रता मात्र अधिक आहे. परिणामी उकाड्यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. मान्सून दाखल होईपर्यंत नागरिकांना अशाच काहीशा तापदायक वातावरणाला सामोरे जावे लागणार आहे. जास्त उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन ही मोठ्या प्रमाणावर होत आहे त्यामुळे देखील पाण्याच्या साठ्यात मोठी घट होत आहे.