देशात कोरोना व्हायरस लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर मुंबईची लाईफलाईन म्हणजेच लोकल ट्रेन देखील ठप्प झाली होती. मात्र 15 जून पासून केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, सरकारी कर्मचारी यांना ट्रेनचा वापर करण्यास मुभा देण्यात आली आहे. हळूहळू ट्रेनमधील वाढती गर्दी पाहता पश्चिम मार्गावर डहाणू ते चर्चगेट अशी थेट सेवा सुरू करण्यात आली आहे. आता डहाणू मधून कामासाठी मुंबई मध्ये येणार्या प्रवाशांना विरारला उतरून ट्रेन बदलण्याचा त्रास थोडा कमी होणार आहे. दरम्यान त्यासाठी आज (17 जुलै) पासून लोकल ट्रेनच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आले आहेत. पश्चिम रेल्वेकडून त्यासाठी नवं वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे.
नव्या वेळापत्रकानुसार, डहाणू रोड वरून सुटणारी पहिली लोकल पहाटे 4 वाजून 40 मिनिटांनी सुटेल ती चर्चगेट स्थानकामध्ये 7 वाजून 15 मिनिटांनी पोहचेल. पूर्वी हीच ट्रेन 5.40 ची होती जी केवळ विरार पर्यंत चालवली जात होती. आता तिला चर्चगेट पर्यंत चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संध्याकाळी चर्चगेट वरून थेट डहाणूला धवणारी पहिली ट्रेन 7 वाजून 40 मिनिटांची असेल. ही ट्रेन रात्री 10 वाजून 25 मिनिटांनी डहाणूला पोहचेल.
Western Railway Tweet
उपनगरीय यात्री कृपया ध्यान दें! अनिवार्य सेवा स्टाफ की मांग के अनुसार पश्चिम रेलवे द्वारा दहानू रोड और विरार के बीच दो विशेष उपनगरीय सेवाऍं चर्चगेट तक विस्तारित और 4 विशेष सेवाओं के परिचालन समय में बदलाव। #WRUpdates pic.twitter.com/TPiUmAMUEr
— Western Railway (@WesternRly) July 16, 2020
सध्या मुंबईमध्ये काही प्रमाणात लोकल सेवा सुरू केली आहे. यामुळे मुंबई शहराच्या नजीक राहणार्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांना ड्युटीवर रूजू होण्यास मदत होणार आहे. परिणामी पुरेसे मनुष्यबळ असल्यास आरोग्य यंत्रणेवरील ताण हलका होईल. अजूनही मुंबईत सार्वजनिक वाहतूक प्रवाशांसाठी पूर्णपणे खुली केलेली नाही. रिक्षा, टॅक्सी सोबतच बस, ट्रेनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांना प्रवेश दिला जातो.