गायिका अनुराधा पौडवाल(Photo credits: File Image)

मुंबई: बिल्डरने केलेल्या फसवणुकीचा फटका प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनाही बसल्याचे समोर आले आहे. अनुराधा पौडवाल यांनी बिल्डरकडून एक फ्लॅट घेतला होता. धक्कादायक असे की, बिल्डरने जो फ्लॅट अनुराधा पौडवालल यांना विकला होता. तोच फ्लॅट त्या बिल्डरने अनेकांना विकल्याचे पुढे आले आहे. हा प्रकार उघडकीस आल्यावर झालेल्या तक्रारीनंतर अर्नाळा कोस्टल पोलिसांनी सात बिल्डरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एकच फ्लॅट अनेकांना विकल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

या प्रकरणातील आरोपींची नावे राजू सुलेरे आणि अविनाश ढोले अशी असून, या दोघांसोबतच इतर पाच जणांवरही गुन्हा दाखल झाल्याचे समजते. ओम मंदार रिएल्डर्स नावाने विरार परिसरात हे लोक एक कंपनी चालवतात. पोलिसांत तक्रार झाल्याचे समजताच सर्वजण फरार झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

विरारचे पोलीस उप अधिकक्षक जयंत बाजबले यांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अर्नाळा बीच परिसरात बिल्डरने स्वस्त किमतीत प्लॅट विक्रीची योजना आणली होती. या योजनेकडे पाहून अनुराधा पौडवाल यांनीही फ्लॅट खरेदी केला. त्यांनी विरार येथील नारंगी येथे मंदार एव्हेन्यू के एफ-१ ग्रुपच्या बिल्डींगमध्ये फ्लॅट बुक केला होता. आरोप होत आहे की, बिल्डरने एकच फ्लॅट अनेक लोकांना बनावट कागदपत्रांच्या अधारे विकला.

दरम्यान, अनुराधा पौडवाल यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, २०१३मध्ये त्यांनी येथे फ्लॅट बुक केला होता. त्यानंतर बिल्डरने त्यांची फसवणूक केली. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलप ४२० (फसवणूक) आणि महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंट्रेस्ट ऑफ डिपॉजिटर्स कायदा १९९९ अन्वये आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.