Court | (Photo credit: archived, edited, representative image)

मुंबईमध्ये (Mumbai) बलात्कार (Rape) आणि हत्येचे अतिशय दुर्मिळ प्रकरण समोर आले आहे. विशेष पॉक्सो न्यायालयाने मंगळवारी एका 24 वर्षीय कन्नू नावाच्या ट्रान्सजेंडरला (Transgender) तीन महिन्यांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावली. या ट्रान्सजेंडरने पुरावा नष्ट करण्यासाठी मुलीचा मृतदेहही पुरला होता. ही घटना 2021 सालची आहे. नवजात बाळाच्या जन्मानंतर मुलीच्या वडिलांनी आरोपी ट्रान्सजेंडरला पैसे आणि भेटवस्तू देण्यास नकार दिला होता. याच रागातून कन्नूने मुलीचे अपहरण करून, तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिची हत्या करून मृतदेह पुरला.

आपल्या निकालात कठोर निरीक्षणे नोंदवत विशेष न्यायाधीश आदिती उदय कदम म्हणाल्या की, ‘असुरक्षित पीडितेची कोणतीही चूक नसताना तिला प्राण्यासारखी वागणूक देण्यात आली. हा गुन्हा अत्यंत भ्रष्ट होता, ज्यामुळे विवेकाला धक्का बसला. केवळ तीन महिन्यांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. असे प्रकरण अतिशय क्रूर आणि दुर्मिळ आहे.’ त्यानंतर न्यायालायाने आरोपी ट्रान्सजेंडरला फाशीची शिक्षा सुनावली.

अहवालानुसार, सचिन चित्तोळे यांच्या घरी मुलीच्या जन्म झाल्यानंतर, 8 जुलै रोजी संध्याकाळी कन्नू त्यांचे अभिनंदन करण्यासाठी त्यांच्या घरी गेला होता. यावेळी त्याने अकराशे रुपये, साडी आणि नारळाची मागणी केली होती. मात्र लॉकडाऊनपासून सचिन यांच्याकडे काम नसल्याने ते हे सर्व देऊ शकले नाहीत. त्यांनी कन्नूला साडी आणि नारळ देण्याचे देऊ केले. मात्र कन्नू पैसे घेण्यावर ठाम होता. काही वेळातच त्यांच्या संवादाचे रुपांतर वादात झाले. त्यानंतर सचिनने कन्नूला घरातून हाकलून दिले. त्या रात्री कन्नूने त्याचा मित्र सोनूला घडलेला प्रकार सांगितला, त्यानंतर दोघांनीही बदला घेण्याचे ठरवले. रात्री 2 वाजण्याच्या सुमारास दोघेही सचिनच्या घरी पोहोचले. जेथे त्यांनी मुलीचे अपहरण करून तिला कफ परेड परिसरात नेले. (हेही वाचा: Pune Crime: अल्पवयीन तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या, घटनेचा व्हिडिओ स्टेटसला ठेवला)

दुसऱ्या दिवशी पीडितेच्या नातेवाईकांनी कफ परेड पोलिसांकडे धाव घेतली. मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला गेला. तपासावेळी काही मच्छिमारांनी पोलिसांना सांगितले की, त्यांनी दोषी कन्नू आणि त्याच्या साथीदाराला रात्री हातात काहीतरी घेऊन जाताना पाहिले आहे. त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली. चौकशीमध्ये दोघांनीही गुन्हा मान्य करून पोलिसांना मुलीला पुरण्याची जागा दाखवली. नंतर दोघांची रवानगी कारागृहात करण्यात आली. आता न्यायालयाने कन्नूला शिक्षा सुनावली आहे. पुराव्याच्या अभावामुळे कन्नूच्या साथीदाराची निर्दोष मुक्तता करण्यात आली.