मुंबई महानगरपालिका म्हणजेच बीएमसीने (BMC) शहरामध्ये तिसरे सीरो सर्वेक्षण (Sero Survey) केले आहे. मार्चमध्ये केल्या गेलेल्या या सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. अहवालानुसार, मुंबईतील 36 टक्के लोकांना कोरोना विषाणू (Coronavirus) होऊन गेला आहे आणि त्यांना याची माहितीच नव्हती. हे रुग्ण आता पूर्णपणे ठीक आहेत. मुंबईमधील 36 टक्के लोकांच्या शरीरात अँटीबॉडीज विकसित झाल्या आहेत. म्हणजेच या लोकांच्या शरीराने कोरोना विषाणूची लढण्यासाठी स्वतःहून ताकद प्राप्त केली. या सीरो सर्वेक्षणात एकूण 10,197 जणांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी पुरुषांमध्ये 35.02 टक्के आणि महिलांमध्ये 37.12 टक्के अँटीबॉडीज दिसून आल्या.
मागील वर्षी देशात कोरोना संसर्ग सुरू झाल्यानंतर मुंबईत याचा सर्वाधिक परिणाम झाला होता. बीएमसीने जुलै 2020 मध्ये पहिले सीरो सर्वेक्षण केले होते, त्यानंतर ऑगस्ट 2020 मध्ये दुसरे व आता मार्च 2021 मध्ये महापालिकेच्या सर्व 24 प्रभागांत तिसरे सीरो सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने अशा लोकांचा समावेश होता ज्यांनी अजून कोरोनाची लस घेतली नाही.
या सर्वेक्षणात झोपडपट्ट्यांमध्ये 41.6 टक्के अँटीबॉडीज आढळून आल्या आहेत, तर जुलैच्या पहिल्या सर्वेक्षणात इथे 57 टक्के अँटीबॉडीज मिळाल्या होत्या व दुसऱ्या सीरो सर्वेक्षणात 45 टक्के अँटीबॉडीज आढळल्या होत्या. त्याच बरोबर तिसर्या सीरो सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की, इमारतीतल्या लोकांच्या तुलनेत झोपडपट्टीत राहणाऱ्या 41 टक्के लोकांना कोरोना इन्फेक्शन झाले आहे आणि त्यांना याची माहितीही नव्हती. कोरोनाच्या दुसर्या लाटेमध्ये मुंबईत 90 टक्के संक्रमित रुग्ण सोसायट्यांमध्ये आढळले आहेत. (हेही वाचा: महाराष्ट्रात 18 ते 45 वयोगटातील सर्वांना कोरोनाची लस मोफत दिली जाणार, राज्य सरकारकडून घोषणा)
तिसर्या सीरो सर्वेक्षणात, इमारतीत राहणाऱ्या लोकांमध्ये 28.5 टक्के अँटीबॉडीज असल्याचे आढळले. इमारतींमध्ये राहणार्या लोकांच्या पहिल्या सर्वेक्षणात 28 टक्के आणि दुसर्या सर्वेक्षणात 18 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज दिसून आल्या. यावरून लक्षात येते की, मागील सर्वेक्षणांच्या तुलनेत या वेळी गृहनिर्माण संस्थांमध्ये राहणाऱ्या लोकांची प्रतिकारशक्ती वाढली आहे.