Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज (3 जुलै) मुंबई शहरामध्ये जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. मध्य उपनगरातील सायन, माटुंगा, शिवाजी पार्क ते दक्षिण मुंबई मध्ये सीएसएमटी परिसरात पावसाला जोर आहे. दरम्यान हवामान वेधशाळेने यापूर्वीच 3 आणि 4 जुलै ला मुंबई, ठाणे, पालघर सह कोकणाला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता. यामध्ये ढगांच्या गडगडाटासह, वीजा कडाडण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबई महानगर पालिकेकडून नागरिकांना अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पावसाचा ऑरेंज अलर्ट पाहता बीएमसीने काही खबरदारीचे उपाय जारी केले आहेत. दरम्यान शहराला कोविड19 चा विळखा असताना पावसामुळे अन्य आजारांनी डोकेदुखी वाढू नये म्हणुन मुंबईकरांच्या वर्दळीवर देखील बंधनं घालण्यात आली आहेत. Maharashtra Monsoon 2020 Forecast: मुंबई, कोकण परिसरात 3, 4 जुलै दिवशी मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याने जारी केला ऑरेंज अलर्ट

सखल भागात साचले पाणी

मुंबईला अति पावसाचा देण्यात आलेला इशारा पाहता पालिकेकडून सखल भागात फार काळ पाणी साचून राहणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे. ठिकठिकाणी पंपिंग मशीन सज्ज ठेवण्यात आले आहेत.

मुंबईमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. त्यानंतर सकाळी 9 वाजल्यापासून पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईमध्ये 11 जूनला मान्सूनचं आगमन झालं होतं. मात्र पाऊस अधूनमधून येऊन जात होता. अजुनही शहरात जोरदार पाऊस झालेला नाही. अचानक पाऊस दडी मारत असल्याने मागील आठवड्यात अनेक मुंबईकर उकाड्याने वैतागले होते.