Mumbai Rain Updates: मुंबई आणि उपनगरांमध्ये आज ढगाळ वातावरणासह पावसाच्या जोरदार सरी बरसण्याची शक्यता- IMD
Mumbai Rains (Photo Credits-ANI)

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीच्या दिवसांत मुंबईसह (Mumbai) राज्यात मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर 2-3 दिवस पावसाने विश्रांती घेतली असली तरी अधून मधून पाऊस सुरु आहे. आजही (10 ऑगस्ट) मुंबई आणि उपगनरांमध्ये ढगाळ वातावरण राहणार असून अधून मधून पावसाच्या जोरदार सरी बरसतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर मागील 24 तासांत मुंबई हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. अशी माहिती मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक (Dy Director General of Meteorology) के.एस.होसाळीकर (K S Hosalikar) यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.

दरम्यान काल राज्यातील नागपुर, चंद्रपुर, भंडारा, वर्धा, गडचिरोली , गोंदिया या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. 11 ऑगस्ट म्हणजेच उद्या पासून राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रीय होणार असल्याचा अंदाज मुंबई हवामान खात्याने वर्तवला आहे.  (मुंबईसह पश्चिम किनारपट्टीवर 10-11 ऑगस्टपासून मान्सून सक्रिय होणार- IMD)

K. S. Hosalikar Tweet:

मागील आठवड्यात मुंबईत तुफानी पाऊस झाला. त्यामुळे मुंबईकरांचे चांगलेच हाल झाले. सखल भाग, रस्ते, रेल्वे मार्ग जलमय झाले होते. पत्रे उडणे, घरात पाणी शिरणे या समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत होते. वृक्ष उन्मळून पडणे, भिंत कोसळणे यामुळे वाहतुकीचा खोळंबाही झाला होता. मात्र 2-3 दिवस सातत्याने सुरु असलेली पर्जन्यवृष्टी थांबली आणि विस्कळीत झालेले जनजीवन पुन्हा पूर्वपदावर येऊ लागले.