Unlock (Photo Credits: Twitter)

मुंबईसह (Mumbai) संपूर्ण महाराष्ट्रात आलेल्या कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेमुळे राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. राज्यात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव मुंबईत पाहायला मिळाला होता. परंतु, मुंबईत गेल्या काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत घट होत चालली आहे. सध्या मुंबई अनलॉक लेव्हल-1 (Level 1) मध्ये प्रवेश केला आहे. मात्र, अजूनही शिथिलता देण्यात आली नाही. तसेच मुंबईत येत्या 27 जूनपर्यंत लॉकडाऊनचे निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने माहिती दिली आहे.

राज्य सरकारने या महिन्यात कोरोना संसर्गाचे दर आणि रुग्णलयात ऑक्सिजन बेडवर उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येवर आधारित निर्बंध कमी करण्यासाठी पाच-टप्प्यांची योजना जाहीर केली आहे. शासकीय आदेशानुसार, ज्या जिल्ह्यातील संक्रमण दर पाच टक्क्यांहून कमी आणि 25 टक्क्यांहून कमी रुग्ण ऑक्सिजन बेडवर उपचार घेत असल्यास त्यांचा लेव्हल 1 मध्ये समावेश केला जाईल. हे देखील वाचा- Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रात आज 6,270 नव्या रुग्णांची नोंद, 94 जणांनी गमावले प्राण

तसेच लेव्हल 3 मध्ये अशा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे, जिथे कोरोना संक्रमणांची संख्या पाच ते दहा टक्के आहे आणि ऑक्सिजन बेडवर उपाचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 40 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

मुंबई महानगर पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील कोरोना संक्रमणाच्या दरात 3.79 टक्के घट झाली आहे. ऑक्सिजन बेडवर 23.56 टक्के रुग्ण उपचार घेत आहेत. मंडळाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, मुंबईत 'लेव्हल 1' प्रवेश करण्यास पात्र ठरू शकतो. परंतु लोकसंख्या घनता, शहराचे भौगोलिक स्थान, मुंबई महानगर क्षेत्रातून शहरात येणाऱ्या लोकल गाड्या आणि तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता संसर्गाची सद्यस्थिती पाहता निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.