घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात (Ghatkopar Hoarding Case) मुंबई गुन्हे शाखेच्या एसआयटीने इगो मीडियाची पूर्व संचालक जान्हवी मराठेला अटक केली. जान्हवी मराठेसह कंत्राटदार सागर कुंभारला देखील पोलिसांनी अटक केली आहे. गोव्यामधून या दोघांना पोलिसांनी अटक केली . याप्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सुरू आहे.  घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडे याच्या इगो मीडिया कंपनीची पूर्व संचालक जान्हवी मराठेला पोलिसांनी अटक केली आहे. सत्र न्यायालयाने अटकपूर्व जमीन फेटाळल्यापासून गुन्हे शाखेचे अधिकारी जान्हवीच्या मागावर होते. अखेर गोव्यातून गुन्हे शाखेच्या पथकाने तिला अटक केली. जान्हवीसोबत कंत्राटदार सागर कुंभारला देखील पोलिसांनी अटक केली. (हेही वाचा - Ghatkopar Hoarding Collapse: घाटकोपर येथील होर्डिंग अपघातातील मृतांमध्ये Kartik Aaryan च्या नातेवाईकांचा समावेश; अंत्यसंस्काराला अभिनेत्याची उपस्थिती- Reports)

घाटकोपर येथील दुर्घटनाग्रस्त झालेलं होर्डिंग बांधल्याचा सागर कुंभारवर आरोप आहे. रविवारी जान्हवी मराठे आणि सागर कुंभारला कोर्टात हजर केले जाणार आहे. जान्हवी मराठे ही डिसेंबर 2023 पर्यंत इगो मीडियाची संचालक होती. याच काळात घाटकोपर येथील दुर्घटनाग्रस्त झालेले होर्डिंग उभारण्यात आले होते

मुंबईमध्ये 13 मे रोजी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला होता. या पावसामुळे घाटकोपरच्या इस्टर्न एक्स्प्रेस हायवेजवळ असलेल्या पेट्रोल पंपावर भलेमोठे होर्डिंग कोसळले होते. या दुर्घटनेमध्ये 17 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. 74 जण जखमी झाले होते. याप्रकरणी घटनेच्या तिसऱ्या दिवशी मुख्य आरोपी भावेश भिंडेला पोलिसांनी राजस्थानच्या जयपूरमधून अटक केली होती.