महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची (MSRTC) सर्वात आरामदायी तसेच सर्वात महागडी बससेवा म्हणून शिवनेरी (Shivneri) तसेच अश्वमेघकडे '(Ashwamedh) पहिले जाते. पुणे-मुंबई मार्गावर तर या बससेवा प्रचंड लोकप्रिय आहेत. मात्र या बसचे दर खूपच जास्त असल्याने सर्वसामान्य लोकांकडून नेहमीच याबाबत तक्रार केली जात होती. आता अखेर या बसच्या दरात प्रचंड कपात करण्यात आली आहे. या बस तिकिटांचे दर तब्बल 80 ते 120 रुपयांनी कमी केले आहेत. येत्या 8 जुलै पासून हे नवे दर लागू होणार आहेत.
एसी बसने (AC) प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. शिवनेरी बसचे दर कमी करण्यात आले आहेत. परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी याबाबत घोषणा केली. या नव्या दरानुसार दादर ते पुणे स्टेशन हा प्रवास तुम्ही फक्त 440 रुपयांमध्ये करू शकणार आहात. सध्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या सात मार्गांवर शिवनेरीच्या दिवसभरात 435 फेऱ्या केल्या जातात. यामध्ये प्रत्येक महिन्याला साधारण दीड लाख प्रवासी प्रवास करतात.
शिवनेरी आणि अश्वमेघ या दोन्ही बसचे दर जास्त असल्याने सर्वसामान्य लोक ओला, उबर अथवा खासगी वाहनाने प्रवास करत असत. त्यामुळे आता या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी, सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पोहोचवून जास्तीत जास्त प्रवासी संख्या वाढवण्याच्या उद्देशाने हे दर कमी करण्यात आले आहेत.