मुंबई- पुणे एक्सप्रेस वे वर बस दरीत कोसळली; 4 जण ठार,30 जखमी
Mumbai- Pune Express Way Accident (Photo Credits: ANI)

मुंबई पुणे एक्सप्रेस वे (Mumbai- Pune Express Way) वर आज सकाळी बोरघाटाजवळ (Borghat) एक खाजगी बस दरीत कोसळल्याने भीषण अपघात (Bus Accident) झाल्याचे समजत आहे. बसचालकाचे लक्ष विचलित झाल्याने हा अपघात झाला असून यामध्ये 4 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर 30 जण गंभीर जखमी असून यापैकी काहींची स्थिती अत्यंत नाजूक आहे. प्राप्त माहितीनुसार, जखमींना विविध स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर वाहनाची वेगमर्यादा झाली 100 किमी प्रति तास; 18 नोव्हेंबरपासून नवा नियम लागू

ANI ट्विट 

झी वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, कराडहून मुंबईकडे जाणाऱ्या या बसवरील चालकाचे लक्ष विचलित होऊन पहाटे पाच वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात जखमी झालेल्या तीस प्रवाशांना कामोठेच्या एमजीएम, खोपोली रुग्णालय, पवना रुग्णालय आणि लोकमान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मृतांमध्ये दोन वर्षांच्या चिमुकल्यासह दोन महिला आणि एका पुरूषाचा समावेश आहे.

दरम्यान,दरीत कोसळतात ही बस झाडावर अडकून पडल्याने काहींचे जीव वाचण्यास मदत झाली. तर मृत्यू झालेल्या प्रवाशांची माहिती अद्याप समोर आलेली नाही. याप्रकरणी पोलीस तपास करत असून संबंधित मृतांची नावे आणि अन्य माहिती बस कंपन्यांकडून गोळा केली जात आहे.