Premises of Dr BR Ambedkar's house vandalised (Photo Credits: ANI)

मुंबईच्या (Mumbai) दादर येथील हिंदू कॉलनीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr BR Ambedkar) यांचे निवासस्थान 'राजगृह' (Rajgruha) आहे. अनेकांसाठी प्रेरणास्थान असलेल्या या ठिकाणाला अनेकजण भेट देतात. मात्र आज संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून या 'राजगृह' येथे तोडफोड करण्यात आली. घरा सभोवतालच्या कुंड्या व झाडांची नासधूस झाली आहे. राजगृहाच्या काचांवर दगडफेक करण्यात आली आहे. यासह घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांचीही तोडफोड केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. सध्या पोलीस या ठिकाणी दाखल झाले असून, चौकशी सुरु आहे.

एएनआय ट्वीट- 

आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे CCTV फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे. आता आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घडलेल्या गोष्टीचा निषेध केला असून, दोषींविरुद्ध कठोर कार्यवाही केली जाईल असे सांगितले आहे.

आपल्या ट्वीटमध्ये ते लिहितात, ‘दादर येथील 'राजगृह' या डॉ.आंबेडकरांच्या निवासस्थानावर काही अज्ञात व्यक्तींनी आज जो हल्ला केला तो निषेधार्थ आहे. याबाबत पोलिसांचा तत्परतेने तपास सुरु असून दोषींविरुद्ध कठोर कार्यवाही केली जाईल.’ (हेही वाचा: सातारा जिल्ह्यात चोरांनी PPE kit घालून सराफाच्या दुकानावर मारला डल्ला; तब्बल 780 ग्रॅम सोने लंपास)

अनिल देशमुख ट्वीट - 

सुप्रिया सुळे यांनीही ही गोष्ट अतिशय संतापजनक असल्याचे म्हणत, या गोष्टीचा तीव्र निषेध केला आहे.

सुप्रिया सुळे ट्वीट-

साधारण 1932-33 च्या दरम्यान 'राजगृह'ची उभारणी झाली होती. स्वतःचे पुस्तक संग्रहालय बनवायचे हा विचार डोळ्यासमोर ठेऊन बाबासाहेबांनी या घराची उभारणी केली होती. भारतीय, विशेषतः आंबेडकरी बौद्ध आणि दलित लोकांसाठी हे स्थान पवित्र आहे. बाबासाहेब आंबेडकर 15-20 वर्षे राजगृहात राहिले होते. शिवाजी पार्कमध्ये 6 डिसेंबर रोजी चैत्यभूमीच्या आधी लाखो लोक या ठिकाणी भेट देतात. आंबेडकरांनी राजगृहात आपल्या काळात 50,000 पेक्षा जास्त पुस्तके जमा केली होती, ज्यामुळे त्यांच्या मृत्यूच्या वेळी ही जगातील सर्वात मोठी वैयक्तिक लायब्ररी बनली होती.