
कोरोना विषाणूविरूद्ध (Coronavirus) लढण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणावर पीपीई किटची (PPE kits) निर्मिती होत आहे. कोरोना वॉरियर्सना हे पीपीई किट देऊन त्यांना या लढ्यात फ्रंटलाईनवर काम करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. मात्र आता या किटचा दुरुपयोग होत असल्याचे निदर्शनास आले आहे. काही लोक पीपीई किटचा वापर करून चक्क चोरी करत आहेत. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात (Satara District) चोरट्यांनी पीपीई किट परिधान करून सराफाच्या दुकानातून सोन्याची चोरी केली आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी पीपीई किट घालून दुकानातून 780 ग्रॅम सोने चोरी केले.
या चोरी प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा ही गोष्ट उघडकीस आली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे की, पीपीई किट परिधान केलेल्या चोरट्यांनी दुकानातील वेगवेगळ्या ठिकाणाहून, शोकेसमधून सोन्याचे दागिने चोरले आहेत. लॉकडाऊन दरम्यान दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली आहे. फुटेजमध्ये कॅप्स, मास्क, प्लास्टिकचे जॅकेट आणि हातमोजे घालून चोर चोरी करताना दिसत आहेत. (हेही वाचा: यापुढे मुंबईमध्ये कोरोना विषाणू चाचणी करून घेण्यासाठी प्रिस्क्रिप्शनची गरज नाही; BMC ने जारी केली नवी मार्गदर्शक सूचना)
या चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. दुकानदाराने तक्रारीत म्हटले आहे की, चोरांनी 78 तोळे म्हणजे 780 ग्रॅम सोन्याची चोरी केली. दुकानदाराने सांगितले की चोरट्यांनी दुकानाची भिंत तोडून आत प्रवेश केला. मात्र आता चोरांचे फुटेज समोर आले असूनही, पीपीई किटमुळे त्यांना ओळखणे अवघड ठरले आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी कोरोना प्रकरणे वाढत असल्याने सातारा जिल्ह्यात लॉक डाऊन होणार असल्याची अफवा पसरली होती, मात्र जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या वृत्ताचे खंडन करीत अफवांवर विश्वास ठेऊ नका असे सांगितले आहे.