बलात्काराचा आरोप असलेले पोलीस उपनिरिक्षक साजन सानप यांची रेल्वेखाली आत्महत्या
साजन सानप (Photo credit : Facebook)

मुंबईच्या पोलीस उपनिरिक्षकाने पुण्यातील संगम पुलाजवळील धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. साजन शंकर सानप (वय 37 वर्ष) असे या पोलीस उपनिरिक्षकाचे नाव आहे. मंगळवारी (27नोव्हेंबर) सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास त्यांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. सानप हे मुंबई येथील आंबोली पोलीस ठाण्यात कार्यरत होते.

या घटनेची रेल्वे पोलिसांच्या नियंत्रण कक्षेला खबर मिळताच, स्थानिक पोलिसांनी या घटनास्थळाचा ताबा घेतला. दरम्यान, ही आत्महत्या नसून अपघात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पुण्याहून शिवाजीनगरकडे जात असताना सानप हे अचानक रेल्वेसमोर येऊन उभे राहिले. रेल्वेची जोरात धडक बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला. आत्महत्येमागील मुख्य कारण अजून समोर आले नसले तरी, पोलीस याचा शोध घेत आहे.

काही दिवसांपूर्वी सानप यांच्याविरोधात एका महिलेने बलात्काराची तक्रार नोंदवली होती. त्यामुळे सानपवर कलम 376 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गतही त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तक्रारीची दखल घेत पोलीसांनी त्यांना अटक करुन कोठडीत ठेवले होते. दरम्यान, कोठडीतून त्यांनी पलायन केले होते. आता आज पुण्यातील संगम पुलाजवळील रेल्वे ट्रॅकवर त्यांचा मृतदेह सापडला आहे.