राज्यात आणि देशात देखील अनेक शहरातून सध्या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या बातम्या समोर येत आहे. मुंबईत देखील भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून त्यांच्यामुळे काही परिसरात त्यांची दहशत नेहमीच जाणवते. भटक्या श्वानांच्या लसीकरणाची प्रक्रिया विविध संस्थांच्या माध्यमातून सुरू असून पुढील मार्च अखेर मुंबईतील 70 टक्के श्वानांचे लसीकरण करण्याची निर्धार पालिकेने केला आहे. आतापर्यंत 25 हजार श्वानांचे लसीकरण पूर्ण झाले असल्याचे मुंबई महापालिकेकडून सांगण्यात येत आहे. (हेही वाचा - Kanpur Stray Dog Attacks: कानपूरमध्ये मंदिरात जाणाऱ्या 11 वर्षीय मुलावर कुत्र्यांचा हल्ला, चिमुकला गंभीर जखमी)
पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने ‘मुंबई रेबीज निर्मूलन प्रकल्प’ अंतर्गत भटक्या श्वानांच्या रेबीज प्रतिबंधक लसीकरणासाठी अभियान सुरू आहे. या अंतर्गत विविध संस्थांच्या साह्याने मुंबई महानगरातील किमान 70 टक्के श्वानांचे रेबीज प्रतिबंधक लसीकरण पुढच्या मार्च अखेर पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. या पैकी आतापर्यंत 25 हजार श्वानांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली.
नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिल्याची माहिती पशुवैद्यकीय विभाग आणि देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. कलीमपाशा पठाण यांनी दिली. नागरिकांनी आपल्या भागातील भटक्या श्वानांची माहिती द्यावी तसेच लसीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. मुंबईत भटक्या श्वानांची संख्या सुमारे 95 हजार इतकी आहे. त्यापैकी सुमारे 25 हजार भटक्या श्वानांचे सप्टेंबर 2023 पासून आतापर्यंत लसीकरण करण्यात आले आहेत.