Mumbai Road Cleaning: मुंबई महापालिकेकडून स्वच्छतेवर अधिक भर, पूर्व-पश्चिम द्रुतगतींच्या सफाईसाठी 180 कोटींचा प्रस्ताव
BMC (File Image)

मुंबई महापालिकेकडून (Mumbai Municipal Corporation) सध्या स्वच्छतेवर अधिक भर दिला जात असून, पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग (Eastern Express Highway) आणि त्यांच्या बाजूला असलेल्या सर्व्हिस रोडच्या स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले आहे. महापालिका या कामांसाठी एकूण 17 यंत्रसामग्री खरेदी करणार असून, 180 कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव आहे. या कामासाठी पालिकेने निविदाही काढली आहे. ( BMC Budget 2024: बृहन्मुंबई महानगरपालिकाकडून बेस्ट बसेससाठी 800 कोटींची तरतूद)

पूर्व द्रुतगती महामार्ग हा पूर्व उपनगरातून जाणारा महत्त्वाचा रस्ता आहे. 23.55 किमीचा हा मार्ग मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, चेंबूर, शीव, दादर, सीएसएमटी परिसर इत्यादी उपनगरांना जोडतो. तर पश्चिम द्रुतगती महामार्ग हा मुंबईतील पश्चिम उपनगरातून जाणारा महत्त्वाचा मार्ग असून, साधारण 24 किमी लांबीचा हा द्रुतगती महामार्ग दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी, विलेपार्ले, वांद्रे इत्यादी उपनगरांना जोडतो.

विजेवर धावणाऱ्या आधुनिक अशा आठ मोठ्या स्विपिंग मशिन आणि नऊ स्वयंचालित पद्धतीने कचरा गोळा करणाऱ्या सात लिटर पिकर मशिन पालिका खरेदी करणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. तर कचरा गोळा करणाऱ्या दोन वाहनांचाही यात समावेश असेल. या यंत्रसामग्रीद्वारे रस्त्यांची रात्री उशिरा आणि पहाटे सफाई केली जाणार आहे.