Mount Mary Bandra Fair | (Photo Credit - X)

मुंबईमध्ये (Mumbai) सध्या गणेशोत्सवासोबत 'माउंट मेरी फेस्टिव्हल'ची (Mount Mary Fair 2024)  धामधूम सुरु आहे. 8 सप्टेंबर रोजी जन्मलेल्या 'मदर मेरी'च्या स्मरणार्थ 'माउंट मेरी फेस्टिव्हल' मुंबईतील वांद्रे येथील 'बॅसिलिका ऑफ अवर लेडी ऑफ द माउंट' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'माउंट मेरी चर्च' येथे आयोजित केला जातो. हा फेस्टिव्ह 'वांद्रे फेअर' म्हणूनही ओळखला जातो. यंदा 8 ते 15 सप्टेंबर या कालावधीत ही जत्रा होणार आहे. या जत्रेच्या काळात हजारो लोक वांद्रे येथील 'माउंट मेरी चर्च'ला भेट देतात. आता या वांद्रे फेअर 2024 च्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी वांद्रे पश्चिम येथील माउंट मेरी चर्चच्या आसपास वाहतूक निर्बंध जाहीर केले.

हे निर्बंध 8 ते 16 सप्टेंबर या कालावधीत जत्रेच्या कालावधीच्या अनुषंगाने लागू केले जातील. वांद्रे फेअर हा मुंबईमधील एक प्रतिष्ठित कार्यक्रम आहे. अभ्यागतांच्या मोठ्या संख्येने, चर्चच्या सभोवतालचे रस्ते गजबजलेले असतात. त्यानुसार वाढीव वाहतूक व्यवस्थापित करण्यासाठी आणि सुरळीत वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी, पोलिसांनी विशिष्ट निर्बंध जारी केले आहेत.

वाहतूक निर्बंध-

माउंट मेरी चर्चच्या आजूबाजूचे प्रमुख रस्ते दररोज सकाळी 6 ते रात्री 11 या वेळेत, पोलीस आणि आपत्कालीन वाहनांद्वारे जारी केलेले विशेष कार पास वगळता सर्व वाहनांसाठी बंद केले जातील. विशेषतः, माउंट मेरी रोड आणि सेंट जॉन बाप्टिस्टा रोड पूर्णपणे रहदारीसाठी बंद असतील.

याव्यतिरिक्त, केन रोड माउंट मेरी रोड येथील जंक्शनपासून बीजे रोडपर्यंत एकेरी लेन म्हणून काम करेल. परेरा रोड ही वनवे असणार आहे. या रोडवर बीजे रोडवरून प्रवेशास परवानगी नसेल. कार्मेल चर्च चॅपल येथे उजवे वळण सर्व वाहनांसाठी प्रतिबंधित असेल.

याशिवाय, सकाळी 6 ते रात्री 11 पर्यंत अनेक प्रमुख रस्त्यांच्या दोन्ही बाजूला वाहने उभी करण्यास किंवा थांबविण्यास बंदी असेल. या रस्त्यांमध्ये माउंट मेरी रोड, परेरा रोड, केन रोड, माउंट कार्मेल रोड, चॅपल रोड, जॉन बॅप्टिस्ट रोड, सेंट सेबॅस्टियन रोड, रेबेलो रोड, डॉ. पीटर डायस रोड, सेंट पॉल रोड आणि सेंट पॉल रोड आणि मेहबूब स्टुडिओ येथील जंक्शन दरम्यान हिल रोडचा एक भाग, यांचा समावेश आहे. (हेही वाचा: Ganpati Idol Price Hike: मुसळधार पावसामुळे गणेश मूर्तींच्या किंमतीत 30 टक्क्यांनी वाढ; दरवाढ पाहून नागरिक थक्क)

दरम्यान, केवळ ख्रिश्चनच नव्हे तर सर्व धर्माचे लोक या कार्यक्रमासाठी गर्दी करतात. ही यात्रा मुंबईच्या सामाजिक आणि धार्मिक परंपरेचे मोठे आकर्षण आहे. अशात या लोकप्रिय वार्षिक कार्यक्रमादरम्यान सर्व उपस्थितांसाठी व्यत्यय कमी करणे आणि सुरक्षा वाढवणे हे मुंबई पोलिसांच्या उपाययोजनांचे उद्दिष्ट आहे.