कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांच्या गाडीला काल (18 डिसेंबर) रात्री उशिरा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र गाडीचा चक्काचूर झाला आहे. काल रात्री सुमारे 11 च्या सुमारास निळजे आणि दातिवली स्टेशनच्या दरम्यान रोड ब्रीजवर हा विचित्र अपघात झाला आहे. यामध्ये उड्डाणपूलावरून कार खाली थेट रेल्वे रूळावर कोसळली.
आमदार राजू पाटील सध्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरामध्ये आहेत. काल रात्री अपघाताच्या वेळेस राजू पाटील यांचा मुलगा आदित्य पाटील गाडीमध्ये होता तर त्यांचा चालक ही गाडी चालवत होता. प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात रॅश ड्रायव्हिंगमुळे झाल्याचा अंदाज आहे.
निळजे- दातिवली स्टेशन दरम्यान कार कोसळल्याने या मार्गावरील कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. या अपघातानंतर गाडीच्या चालकाला पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले.