Mumbai Metro Line-9: मिरा-भाईंदर परिसरात मेट्रो लाईन-9 साठी एमएमआरडीएने यशस्वीपणे बसवला 65 मीटर स्टील गर्डर
एमएमआरडीएने मुंबई मेट्रो लाईन-9 साठी भाईंदर आरओबीजवळ 65 मीटरचा स्टील गर्डर यशस्वीरित्या बसवला. सध्या 95% काम पूर्ण झालेल्या या डबल-डेकर प्रकल्पामुळे मुंबईभर उपनगरीय संपर्क वाढेल असे, सांगितले जात आहे.
Metro Construction Update: मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (MMRDA) ने भायंदर पश्चिम रस्त्यावरील उड्डाणपूल (Bhayandar ROB) जवळ 65 मीटर लांबीचा स्टील कंपोझिट गर्डर यशस्वीपणे बसवून मेट्रो लाईन-9 (Mumbai Metro Line-9) च्या उभारणीतील एक महत्त्वाचा अभियांत्रिकी टप्पा पूर्ण केला आहे. पश्चिम रेल्वे, कोकण रेल्वे आणि स्थानिक वाहतूक यंत्रणांमध्ये समन्वय साधत, हे काम 7, 8 आणि 11 जून 2025 रोजी रात्रीच्या ब्लॉक दरम्यान पूर्ण करण्यात आले आहे. हळूहळू मुंबई शहरामध्ये मेट्रोचे जाळे विणले जात आहे.
मुंबईतील पहिलाच डबल-डेकर पायाभूत प्रकल्प
भायंदर पश्चिम रस्त्यावरील उड्डाणपूलाजवळ बसवलेल्या या स्टील गर्डरचे वजन सुमारे 700 मेट्रिक टन असून त्याची रुंदी 9.575 मीटर आहे. गर्डरचे तीन विभाग करण्यात आले होते, हे गर्डर प्रत्येकी 235 मेट्रिक टन वजनाचे होते, असे फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वत्तात म्हटले आहे. हे काम 600MT आणि 750MT क्षमतेच्या क्रेन्सच्या मदतीने पार पडले, तर एक 600MT क्रेन राखीव ठेवण्यात आली होती. मेट्रो लाईन-9 हा मुंबईतील पहिलाच डबल-डेकर पायाभूत प्रकल्प असून यामध्ये वाहन उड्डाणपूलाखाली मेट्रोचा व्हायाडक्ट उभारण्यात येत आहे. हा प्रकल्प 10.54 किलोमीटर लांबीचा असून त्यात 8 उन्नत स्थानके आहेत. सध्या याचे 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. (हेही वाचा, Mumbai Metro 9 Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला दहिसर (पूर्व) ते मीरा-भाईंदरला जोडणाऱ्या मुंबई मेट्रो-9 च्या ट्रायल रनला हिरवा झेंडा; जाणून घ्या कधी सुरु होणार)
मेट्रो लाईन-9 बद्दल ठळक घडामोडी
पहिल्या टप्प्यात दहिसर (पूर्व) ते काशीगाव दरम्यान 4.4 किलोमीटर अंतरावर चार मेट्रो स्थानकांसह ट्रायल रन सुरू आहे. या स्थानकांमध्ये दहिसर (पूर्व), पांडुरंगवाडी, मीरागाव आणि काशीगाव यांचा समावेश आहे. (हेही वाचा: Pune Metro Accident Viral video: पुण्यातील चिंचवड येथे मेट्रो कामादरम्यान स्टील खांबाची चौकट कोसळली, अनेक वाहनांचे नुकसान)
मेट्रो लाईन-9 पूर्ण प्रकल्पाती मार्ग
प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर, मेट्रो लाईन-9 मुळे पश्चिम उपनगरांतील प्रवासात मोठा बदल होणार असून मिरा-भाईंदर परिसर थेट प्रमुख ट्रान्झिट पॉइंट्सशी जोडला जाणार आहे. त्यात खालील मार्गांचा समावेश असेल:
- छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (लाईन 7 आणि 7A द्वारे)
- अंधेरी (पश्चिम) (लाईन 2B द्वारे)
- घाटकोपर (लाईन 1 आणि 7 द्वारे)
दरम्यान, भविष्यात ही लाईन लाइन-10 शी जोडली जाणार असून, ती ठाण्यापर्यंत पोहोचेल. तसेच, लाइन-13 मुळे ही सेवा वसई-विरार पर्यंत विस्तारली जाणार आहे. पहिला टप्पा डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे, तर दुसरा टप्पा, जो नेताजी सुभाषचंद्र बोस (NSCB) स्टेशन पर्यंत जाईल, तो डिसेंबर 2026 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येच्या गरजांसाठी समाकलित आणि मल्टी-मोडल ट्रान्सपोर्ट प्रणालीला चालना देणारा ठरणार आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jun 19, 2025 11:18 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

