Metro (PC- Wikimedia Commons)

Mumbai Metro 3 Phase 1: लवकरच मुंबईकरांसाठी बहुप्रतीक्षित मेट्रो 3 च्या पहिला टप्प्याची (Mumbai Metro 3 Phase 1) सेवा सुरु होणार आहे. अहवालानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 ऑक्टोबर रोजी मुंबई दौऱ्यात काही पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. यामध्ये मेट्रो 3 चा समावेश आहे, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) ने मेट्रो 3 च्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी केली आहे. उद्घाटनानंतर आरे कॉलनी-जेव्हीएलआर आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स दरम्यान सेवांचे ऑरेशन सुरु होईल.

एमएमआरसीएल व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी सांगितले की, ते सध्या मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (CMRS) द्वारे वैधानिक तपासणी करण्याच्या प्रक्रियेत आहेत. रोलिंग स्टॉकची तपासणी आधीच पूर्ण झाली आहे. सीएमआरएस तपासणीनंतर, भारत सरकारकडून मंजुरी प्रक्रियेत आहे. ही मंजुरी मिळाल्यानंतर, सीएमआरएसला मेनलाइन तपासणीसाठी आमंत्रित केले जाईल आणि जर त्यांनी त्यास मान्यता दिली तर पहिल्या टप्प्यातील ऑपरेशनला सुरुवात होईल.

भिडे यांनी सांगितले की, सरकारने मेट्रो 3 चे ऑपरेशन सुरू करण्यासाठी कोणतीही तारीख जाहीर केली आहे. सीएमआरएसकडून अंतिम मंजुरी मिळाल्यावर उद्घाटन होण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधी अनेक अहवाल समोर आले आहेत, ज्यामध्ये म्हटले आहे की, येत्या 4 ऑक्टोबरला पीएम मोदींच्या हस्ते मुंबई मेट्रो 3 फेज 1 चे उद्घाटन होईल. या लाईनच्या दुसऱ्या टप्प्याचे काम पुढील वर्षभरात पूर्ण होणे अपेक्षित आहे. (हेही वाचा: Senior Citizens Mumbai: मुंबई लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डबा)

मेट्रो लाइन 3 ही 33.5 किलोमीटर पसरलेली असून, संपूर्ण मुंबईतील कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी डिझाइन केलेला एक एक महत्त्वाचा उत्तर-दक्षिण कॉरिडॉर आहे. ही लाईन सहा व्यावसायिक उपनगरे, 30 कार्यालयीन क्षेत्रे, 12 शैक्षणिक संस्था, 11 प्रमुख रुग्णालये, 10 वाहतूक केंद्रे आणि मुंबईतील दोन्ही विमानतळांना जोडेल. या विस्तृत नेटवर्कचा उद्देश संपूर्ण शहरात प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी करण्याचा आहे. दरम्यान, हा भूमिगत कॉरिडॉर आहे. कॉरिडॉरवर 27 स्थानके असून, त्यातील 26 भूमिगत आणि एक जमिनीवर आहे. पहिल्या टप्प्यात आरे ते बीकेसी, दुसऱ्या टप्प्यात बीकेसी ते वरळी आणि तिसऱ्या टप्प्यात वरळी ते कुलाबा दरम्यान मेट्रो सेवा सुरू करण्यात येणार आहे.