Mumbai: महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी
Kishori Pednekar | (Photo Credits: ANI)

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांच्यासह परिवाराला जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र आले आहे. तर भाजप आमदार आशीष शेलार आणि किशोरी पेडणेकर यांच्यामध्ये महिलांवरुन झालेल्या वादानंतर त्यांना हे पत्र आले आहे. पत्रात महापौर यांच्या परिवाराला गोळ्या घालून संपवण्यासह अश्लील भाषेचा वापर केला आहे. या प्रकरणी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडून पोलिसात तक्रार करण्यात येणार आहे. त्याचसोबत त्यांना पोलीस संरक्षण मिळावे अशी ही मागणी करणार आहेत.

महापौरांच्या बंगल्यावर गुरुवारी संध्याकाळी हे पत्र आले. त्यामध्ये जीवे मारण्याची धमकी दिली गेली. टीव्ही9 ने दिलेल्या बातमीनुसार, माझ्या दादाकडे वाकड्या नजरेने बघू नका असे त्या पत्रात लिहिले होते. तर पत्राच्यावर आणि पत्राच्या खाली दोन वेगळी नावे सुद्धा लिहिण्यात आली आहेत. यापूर्वी सुद्धा किशोरी पेडणेकर यांना अशा पद्धतीचे पत्र आले होते. त्यावेळी त्यांना फोन करत धमकी दिली गेली होती. तर हा प्रकार आता दुसऱ्यांदा घडला आहे.(Kishori Pednekar Vs Ashish Shelar: महापौर किशोरी पेडणेकर यांची तक्रार, आमदार आशिष शेलार यांच्या विरोधात गुन्हा दाखल)

दरम्यान, किशोरी पेडणेकर यांनी केलेल्या तक्रारीनंतर भाजप आमदार आशीष शेलार  यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मुंबईतील मरीन ड्राईव्ह  पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आमदार आशिष शेलार यांनी महापौर किशोरी पेडणेकरयांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरळी येथे सिलिंडर स्फोट झाल्याची घटना घडली होती. या स्फोटावरुन सुरु झालेल्या आरोप-प्रत्यारोप आणि टीका टिपण्णीचा वाद पोलिस स्टेशनपर्यंत पोहोचला.