Mumbai Local: शालेय शिक्षक व शाळांमधील इतर शिक्षकेतर कर्मचार्‍यांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची परवानगी; Railways ने मान्य केली सरकारची मागणी 
Mumbai Local | Photo Credits: Unsplash.com

कोरोना व्हायरस (Coronavirus) आणि त्यानंतरच्या लॉक डाऊन (Lockdown) मुळे देशातील अनेक घटकांवर परिणाम झाला होता. याकाळात आर्थिक क्रिया थांबल्या होत्या, लोकांच्या नोकऱ्या गेल्या तसेच दळणवळणाची साधनेही थंडावली होती. आता सरकारने याबाबतीत मोठ्या प्रमाणात शिथिलता आणली आहे. मुंबईची जीवनवाहिनी अशी ओळख असलेली लोकल (Mumbai Local) सेवाही काही महिने बंद होती मात्र सध्या ती ठराविक लोकांसाठी सुरु झाली आहे. यामध्ये भर पडत आता शालेय शिक्षक  (School Teachers) व शाळांमधील इतर शिक्षकेतर कर्मचार्‍यांना (Non-Teaching Staff) उपनगरीय रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

याबाबत एएनआयने ट्वीट करत माहिती दिली आहे. यामध्ये म्हटले आहे. ‘महाराष्ट्र सरकारच्या विनंतीनुसार रेल्वे मंत्रालयाकडून, शालेय शिक्षक व शाळांमधील इतर शिक्षकेतर कर्मचार्‍यांमुंबई ना उपनगरीय रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. स्थानकांवरील प्रवेशासाठी वैध ओळखपत्रे आवश्यक आहे- वेस्टर्न रेलवे पीआरओ’.

महाराष्ट्र सरकारने दिवाळीनंतर 9 वी ते 12 वीसाठी शाळा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. आता या पार्श्वभूमीवर लोकलमधून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ठाकरे सरकारने मध्य आणि पश्चिम रेल्वेला यासंदर्भात एक पत्र लिहून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा द्यावी अशी विनंती केली होती. आता आज ही विनंती मान्य करण्यात आली आहे. (हेही वाचा: अंगणवाडी सेविकांना राज्य शासनाकडून दिवाळीचे गिफ्ट; भाऊबीजेची भेट म्हणून मिळणार दोन हजार रुपये- महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर)

दरम्यान, सुमारे 7 महिन्यांच्या नंतर महाराष्ट्र सरकारच्या आवाहनानंतर रेल्वे मंत्रालयाने 21 ऑक्टोबरपासून महिलांना मुंबई लोकल गाड्यांमध्ये प्रवास करण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर एक दिवसानंतर राज्य सरकारने प्रायव्हेट गार्ड्सना लोकल गाड्यांमध्ये प्रवास करण्याची परवानगी देण्याचा निर्णयही घेतला होता. अलीकडेच मुंबईच्या डब्बेवाल्यांनाही पश्चिम रेल्वेच्या लोकल गाड्यांमध्ये प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत लोकांचे टिफिन आता वेळेवर पोहोचू शकतील.