नवी मुंबई मध्ये उत्तर प्रदेश चा एक व्यक्ती लोकल ट्रेन मधून पडल्याने दिव्यांग झाल्याचा प्रकार समोर आला आहे. गर्दीमुळे तो खाली पडल्याची ही घटना 26 एप्रिलची आहे. पीडीत व्यक्तीचं नाव कुमार लालजी दिवाकर आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार त्याने उजवा हात गमावला आहे आणि पायाला फ्रॅक्चर झाले आहे. कुमार हा चार मुलांचा बाप आहे. नेरूळला लोकल मध्ये चढल्यानंतर 4जणांनी त्याच्यासोबत अरेरावी करत त्याला बाहेर फेकल्याचं समोर आले आहे.
हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्ट्सनुसार, ही घटना 26 एप्रिलची आहे. नेरूळ ते उरण प्रवास करण्यासाठी कुमार ट्रेनमध्ये चढला. ट्रेन सुरू होताच तो गर्दी मध्ये स्वतःला जागा करत होता. यामुळे ट्रेनमधील अन्य 4 प्रवासी वैतागले. नंतर त्यांनी कुमार सोबत अरेरावी सुरू केली. त्याने माफी मागितली तरीही त्यांनी त्याच्यावर दादागिरी सुरूच ठेवली. एकाने त्याला डब्ब्यातून ढकलण्यापूर्वी चाकूचा धाक दाखवला. तो खाली पडताच ट्रेन त्याच्या हातावरून गेली. त्याच्या पायाला देखील दुखापत झाली.
रेल्वे कर्मचार्यांना हा प्रवासी ट्रॅक वर पडलेला दिसला तेव्हा त्यांनी तातडीने त्याला वाशीच्या NMMC Hospital मध्ये नेले आणि हा प्रकार प्रकाशझोकात आला. वाशी मधून त्याला सायन हॉस्पिटलला नेण्यापूर्वी जे जे हॉस्पिटल मध्येही आणण्यात आले.
डॉक्टरांनी कुमारची स्थिती स्थिर असल्याचं सांगितलं मात्र त्याला उजवा हात गमवावा लागला आहे. जीआरपी कडून जबाब नोंदवून तक्रार घेण्यात आली आहे. त्याला हॉस्पिटल मधून सुट्टी मिळाल्यानंतर पोलिस त्याला सीसीटीव्ही फूटेज दाखवणार आहेत. ज्याद्वारा आरोपी ओळखले जाऊ शकतात. दरम्यान पीडीत कुमारच्या नातेवाईकाने दिलेल्या माहितीनुसार तो शहरात नोकरीच्या शोधासाठी आठवडाभरापूर्वीच आला होता. उल्वे मध्ये तो लॉन्ड्री साठी नोकरी शोधत होता.