Suicide | Representational Image (Photo Credits: Pixabay)

सोशल मिडियावर इंफ्लुएन्सर (Social Media Influencer) फॉलोअर्स वाढवण्यासाठी कोणत्या थराला जातील याचा काही नेम नाही. मुंबईमधील (Mumbai) एका इंफ्लुएन्सरने एडिटिंग सॉफ्टवेयर आणि स्पेशल इफेक्टचा वापर करुन आत्महत्येचा (Suicide) व्हिडिओ बनवून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केला. आता आत्महत्येसारख्या कृत्यास प्रमोट केल्याबद्दल या इंफ्लुएन्सरला मुंबईमध्ये अटक करण्यात आली आहे. इरफान खान असे या इंफ्लुएन्सरचे नाव असून तो अवघ्या 20 वर्षांचा आहे. त्याने इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया अकाउंटवर आपले फॉलोअर्स वाढवण्यासाठी, रेल्वे रुळावर बसून वेगवान ट्रेनच्या खाली येऊन आत्महत्या केल्याचा एक व्हिडिओ बनविला होता.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, इरफान हा विलेपार्ले (पश्चिम) येथील रहिवासी आहे. हा व्हिडिओ वांद्रे आणि खार स्थानक दरम्यान चित्रित करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये आरोपी इरफान अशा व्यक्तीचा अभिनय करताना दिसत आहे ज्याची प्रेयसी त्याला सोडून गेली आहे. प्रेमभंगाचे दुःख घेऊन इरफान रेल्वे रुळावर बसला आहे व एक वेगवान ट्रेन त्याला उडवते असे चित्रण केले आहे. इरफानने एडिटिंग सॉफ्टवेयर आणि स्पेशल इफेक्टच्या मदतीने ट्रेनसमोर आत्महत्येचा हा व्हिडिओ तयार केला होता आणि सोशल मीडिया अकाउंटवर अपलोड केला होता.

मुंबई रेल्वे पोलिस आयुक्त खालिद यांनी सांगितले की हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड झाल्यानंतर रेल्वे पोलिसांच्या पथकाने आरोपी इरफानचा शोध घेतला व त्याला अटक करण्यात आली. डीसीपी प्रदीप चव्हाण म्हणाले की, आरोपी इरफानविरोधात भादंवि कलम 188, 336 आणि 505 (1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासह, त्याच्याविरूद्ध भारतीय रेल्वे कायद्याचे कलम 145 आणि 147 देखील लागू करण्यात आले आहे. आरोपी इरफानने सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्यासाठी असा व्हिडिओ बनवला होता, असेही पोलिसांनी स्पष्ट केले. (हेही वाचा: Pune: धबधब्यावर फिरण्यासाठी गेलेल्या वडीलांसह दोन मुलांचा बुडून मृत्यू)

इरफानने आणखी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून स्पष्टीकरण दिले आहे की, या द्वारे कोणालाही आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा त्याचा हेतू नव्हता. त्याने असा व्हिडिओ पोस्ट केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे आणि म्हटले आहे की या व्हिडिओचा दुसरा भाग देखील येत होता, ज्यामध्ये तो स्वप्नातून उठून आपल्या आई आणि वडिलांबरोबर आनंदी आहे असे दाखविले जाणार होते.